संदेवनशील_मनाचा_IAS अधिकारी रमेश घोलप …..! साहेबांचा आज वाढदिवस

आई बांगड्या विकायची तर वडलांच सायकलचं दुकान. गावही हजार- दीडहजार वस्तींच छोटसचं. तिथून शिक्षणासाठी गावतला रमू बाहेर पडतो अन् परिस्थितीची एैशी तैशी करत, अनेक अडचणींना पायांनी लाथाडत, फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतो. एकेकाळी दुसऱ्याच्या लग्नात भालदार-चोपदार रंगवणारा रमू आयएएस बनण्याचे स्वप्न रंगवतो. अन् गावात येईल, तर लाल दिव्याच्या गाडीतच असे म्हणून गाव सोडतो आणि पुन्हा परततो ते IAS रमेश घोलप साहेब बनूनच.

ही कथी कुठल्या हिंदी मालिकेतील नाही. ही कथा राजकुमार हिरानी किंवा नीरज पांडेंच्या चित्रपटातलीपन नाहीये. ही एक गोष्टय अनेक संघर्षाची, ही गोष्टय एका खडतर अनुभवाची, ही गोष्टय वास्तव जगलेल्या घोलप साहेबांची. आज झारखंड राज्याच्या कृषी संचालनालयाचे प्रमुख म्हणून घोलपसाहेब राज्यातील कृषी विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. अगदी माळरानावर अन् शेताच्या बांधावर बालपण घालवणाऱ्या मुलाला आज एका राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. साहजिकच, अशावेळी आपला भूतकाळ न विसरणारी अशी व्यक्ती तेथील शेतकऱ्यांसाठी देवदूतचं.

2012 साली साहेबांनी आयएएस परीक्षा पास केली अन् सर्वप्रथम नक्षलग्रस्त झारखंड राज्यात पोस्टींग झाली. एका जिल्ह्याच्या कलेक्टरनंतर, गँग्ज ऑफ वासेपूरने भारताला ओळख करुन दिलेल्या धनबादचे ते महापालिका आयुक्त बनले. तिथं, धमकीचं पत्र पाठवणाऱ्या गुंडशाहीलाही निडरपणे ते सामोरे गेले. आपल्या धाडसी कामातून अन संवेदनशील मनातून त्यांनी जिल्ह्यातील सामान्य माणसाला आपलसं केल. एकदा फुड अन् ड्रग्ज विभागातील अधिकाऱ्यांना घेऊन साहेब दौऱ्यावर निघाले. एका हॉटेलवर धाड टाकली. तेव्हा हॉटेलवर भांडे घासणारी 65 ते 70 वर्षाची वृद्धा पाहून त्यांना आपली आई आठवली. साहेबांनी त्या वृद्धेकडे जाऊन तिला पेन्शन का मिळत नाही, याची चौकशी केली. तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोलावले. त्या वृद्धेच्या अपुऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले. अन् काही दिवसांतच त्या वृद्ध महिलेला वृद्धा आणि विधवा पेन्शन मिळवून दिली. ‘इथे थांबणे नाही’, हे जणू त्यांचा स्वभावच बनला आहे. त्यानुसार तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. तर जिल्हाभरात ही पेन्शन मोहीम राबवली. अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना गावागावात पळायला भाग पाडले. एक सामान्य माणून असामान्य बनतो, तेव्हा सर्वसामान्यांची कामे किती सहज होतात, हे त्यांनी दाखवून दिले. साहेबांच्या या कामातूनच ‘पेन्शनवाला साहब’ अशी त्यांची ओळख बनली. म्हणूनच म्हणावे वाटते, साहेब म्हणजे बार्शीने झारखंडला दिलेले ‘दुसरे तुकाराम मुंढेच’.

एकवेळेस UPSC क्रॅक करण सोपयं, कलेक्टर होणं सोप्पयं. पण, कलेक्टर झाल्यावर आपल्यातला सामान्य माणूस जिवंत ठेवण खूप कठीणयं. एक जूना मित्र बनून राहणं खूप अवघडयं. एक गाववाला बनून पारावर बसणं तर सोडूनच द्या. कारण, ‘राव झाल्यावर त्याचा अरेराव’ होतोच. मात्र, घोलपसाहेब या गोष्टीला अपवाद आहेत. झारखंडला असूनही बार्शीची बित्तंबातमी त्यांच्याकडे असते. बार्शीला आल्यावर जसं ते माजी आमदार प्रभाताई अन् काम्रेड नेते ठोंबरे सरांना भेटायला जातात. तसंच छोटसं दुकान असलेल्या फोटोवाल्या सोमाकडंही फोटोचा अल्बम आणायला ते स्वत: जातात. मित्राच्या टपरीवर चहा पितात, तर पानपट्टीवर उभे राहून गप्पा मारतात.

परवाचाच किस्साय, साहेबांनी दिल्लीच्या राष्ट्रीय कृषी संमेलनातील सहभागाची पोस्ट फेसबुकवर टाकली. त्या पोस्टवर मोहोळच्या एका व्यक्तीने आगळगावच्या मित्राचा संदर्भ देत कमेंट केली. आमच्या एका स्वयंसेवी संस्थेची टीम झारखंडमध्ये येत आहे. तुम्हाला वेळ असेल तर भेटायचं आहे, असं त्या व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिले. त्या, अनोळखी व्यक्तीच्या कमेंटवर रिप्लाय देत Ok, my office …… येथे आहे, असा पत्ता साहेबांनी दिला. निश्चितच त्या व्यक्तीचा आनंद शब्दात न सांगता येणारा आहे. साहेब, परिस्थितीने दिलेला एक गुण आपल्याकडयं, जो कित्येक गुणांच प्रतिनिधित्व करतो, तो म्हणजे ‘संवेदनशीलता’. त्यामुळेच आपल्या भूतकाळाची जाणीव ठेवून वर्तमानात जगणारा अन् भविष्याची ‘उमेद’ बाळगणारा रमेश आजही बार्शीकरांना आपल्यात दिसतो.

म्हणूनच शुभेच्छा देताना म्हणावे वाटते, ‘गरिबीची श्रीमंती भोगून श्रीमंतीत गरिबीची जाणीव ठेवणाऱ्या ‘संवेदनशील घोलपसाहेबांना’ जन्मदिवसाच्या ‘संवेदनापूर्वक शुभेच्छा’…….

मयूर_गलांडे

उपसंपादक लोकमत

admin: