संकट गंभीर, सरकार खंबीर… थोडे अधिक संवेदनशीलही व्हा ;वाचा सविस्तर-

संकट गंभीर, सरकार खंबीर… थोडे अधिक संवेदनशीलही व्हा

महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने देशातील रेल्वे आणि उपनगरी म्हणजे लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या सर्व शहरांमध्ये १४४ कलम लागू करण्याची घोषणा केली.

शहरांतर्गत बस सेवा, खासगी बसेस आणि एसटी बसेसही बंद होतील. अत्यावश्यक सेवांसाठी शहरांतर्गत बस वाहतूक सुरू राहणार आहे. संकट गंभीर आहे आणि त्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे मुंबईतील लोकल आणि बेस्ट बस सेवा तातडीने बंद करायला पाहिजे, अशी भूमिका तीन दिवसांपूर्वी मी एका खासगी वृत्तवाहिनीवरून मांडली होती.

महाराष्ट्र सरकार त्यासंदर्भात सावधगिरीने पावले टाकत होते. या सेवा बंद केल्यानंतर शहराचे जनजीवन ठप्प होईल, अशी भीती असल्यामुळे लोकांना गर्दी कमी करण्याचे आवाहन करण्यात येत होते आणि लोकांनी संयम न पाळल्यास लोकल बंद करण्याचे पाऊल उचलले जाईल, असे सुचवण्यात येत होते. दरम्यान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आधी आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि नंतर दहावीचा राहिलेला पेपरही पुढे ढकलण्यात आला. मग महाराष्ट्र सरकारने मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या चार शहरांमध्ये लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारच्या जनता कर्फ्यूचे आवाहन केले. आणि सगळीकडे भक्तांनी मोदींच्या मास्टरस्ट्रोकची चर्चा सुरू केली. करोनाच्या संकटामुळे मोदी देशात अडकून पडले आहेत. केंद्रसरकारने आणि केंद्रसरकारमधल्या घटकांनीही सुरुवातीपासून या संकटाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याची वस्तुस्थिती आहे. संसदेच्या सुरक्षिततेच्या बाबतीतही गलथानपणा दाखवण्यात आला. आणि वर सगळे भक्त मास्टर स्ट्रोकची चर्चा करू लागले.

कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करण्याची खोड गंभीर संकटाच्या काळातही जात नाही, हेच खरे. या काळात ज्योतिषी आणि भडभुंज्यांच्या कल्पनाशक्तीला जे काही उधाण आले, त्याबद्दल तर बोलायलाच नको.

इव्हेंटबाजी न करता आणि थाळ्या-टाळ्या न वाजवताही संकटाच्या काळात गंभीरपणे काम करता येते, हे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारने दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा अनुभव नसला तरी ते परिस्थिती कौशल्याने हाताळत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे तर आई रुग्णालयात असताना सध्याच्या परिस्थितीत अहोरात्र काम करताहेत.

राज्यातील आरोग्य यंत्रणेने जोखीम पत्करून सेवेसाठी वाहून घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनीही कमालीची कार्यक्षमता दाखवली आहे. पोलिसांचे या काळातील वर्तनही जबाबदारीचे दिसून येते. वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री आपापल्या खात्यांची जबाबदारी ओळखून त्या मर्यादेत काम करताहेत. किरकोळ अपवाद वगळता मंत्रिपातळीवर वाह्यातपणा दिसलेला नाही.

तीन पक्षांचे सरकार असूनही कमालीचा समन्वय दिसून येत आहे. आपण करीत असलेल्या कामाचे ढोल न वाजवता किंवा जाहिरातबाजी न करता शांतपणे आणि गंभीरपणे काम करण्याचा वस्तुपाठ महाराष्ट्र सरकारने घालून दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर असल्याचा दिलासा राज्यातील जनतेला दिलेला आहे. जे उद्योग, व्यवसाय बंद आहेत त्यांनी आपल्या कामगारांना या काळातील वेतन द्यावे, असे आवाहन सरकारने केले आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद कसा आहे, ते समजायला थोडा काळ जावा लागेल.

सरकारने यासंदर्भात केवळ आवाहन करून भागणार नाही, तर आदेश काढून त्याचे उल्लंघन करणारांविरोधात कठोर कारवाईचे पाऊल उचलायला पाहिजे. हे झाले एक पाऊल. परंतु कल्याणकारी राज्यात एवढे पुरेसे ठरणारे नाही. हातावर पोट असणा-या लोकांच्यासाठी सरकारने स्वतःच्या खिशात हात घालण्याची आवश्यकता आहे. अशा काळात एकही माणूस उपाशी राहणार नाही, यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. रोजगार बुडाल्यामुळे ज्यांचे बँकांचे हप्ते तटू शकतात, त्यांना दिलासा देण्यासाठी काही निर्णय घ्यायला पाहिजेत. त्यातून महाराष्ट्र सरकारची संवेदनशीलता अधिक दिसून येईल.

गेले दोन दिवस मुंबई-पुण्यात दिसणारे चित्र अस्वस्थ करणारे आहे. पोटासाठी महानगरात आलेले लोक भयभीत होऊन आपल्या गावाकडे परतू लागले आहेत. इथं कुठेतरी झोपडीत, दुकानाच्या फळीवर झोपून पोटाची खळगी भरणारे हे लोक गावाकडे जाऊन काय करणार आहेत, आणि किती दिवस त्यांना गावाकडे राहावे लागणार आहे याची काहीच कल्पना नाही. परंतु जान बची लाखो पाये, असं म्हणत त्यांनी गड्या आपुला गाव बरा जवळ केला आहे. महानगरं पोट भरत असली तरी सुरक्षिततेची ऊब शेवटी गावाच्या कुशीतच असते, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे.

या काळात ठळकपणे लक्षात राहिलेल्या दोन बाबी मुद्दाम नमूद कराव्या लागतील.

कोल्हापूर येथील मुस्लिम समाजाने सगळ्यात आधी सामुदायिक नमाजही बंद करण्याची घोषणा केली. रविवारी बंदच्या दिवशी मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर यांच्याकडून, कुणी जेवायचे असेल तर मुस्लिम बोर्डिंगमध्ये यावे, असे आवाहन करण्यात येत होते.

पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी, शिक्षणासाठी बाहेरगावचे अनेक विद्यार्थी राहतात. त्यांची जेवणाची गैरसोय लक्षात घेऊन सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील युवक काँग्रेसने सरचिटणीस मानस पगार यांच्या पुढाकाराने पुण्यात अशा विद्यार्थ्यांसाठी भोजन पार्सलची व्यवस्था केली.

एकूण वातावरणात या छोट्या गोष्टी असल्या तरी त्यांचे मोल खूप मोठे आहे. सामाजिक संस्थांनी, राजकीय संघटनांनी थोडे इव्हेंटच्या पलीकडे जाऊन विचार केला तर पुढील काळातही अशा काही गोष्टी करता येतील.

ता. क. – शंख, घंटा, टाळ्या आणि थाळ्यांचा इव्हेंट जोरदार झाला. मोदीजींनी बाजी मारली. काहीच न करता आपण खूप काही करतो आहोत, असे चित्र निर्माण केले आण तसा भ्रम लोकांच्याही मनात निर्माण करण्यात ते यशस्वी झाले.

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या फेसबुक वॉल वरून साभार

ग्लोबल न्युज नेटवर्क: