श्री विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन आता जिओ टीव्हीवर, मंदिराला मिळणार एवढ्या कोटींचे उत्पन्न,वाचा सविस्तर-

पंढरपूर, — महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन जगभरातील भाविकांना आता टाटा स्कायसोबतच जिओ टीव्हीवरही पाहायला मिळणार आहे. 12 जुलैपासून म्हणजे येत्या आषाढी एकादशीपासून जिओ टीव्हीवरील श्री विठ्ठल दर्शन या भक्तीपूर्ण चॅनेलचे मोफत प्रसारण सुरू होणार आहे.

जिओ टीव्ही आणि टाटा स्कायसोबत झालेल्या नव्या करारामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला येत्या तीन वर्षात एकूण तब्बल 1.25 कोटीं रूपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे भाविकांना घरबसल्या श्रींचे मोफत लाईव्ह दर्शन होणार आहेच; शिवाय समितीच्या उत्पन्नातही मोठी भर पडणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली .

आषाढी वारीच्या सोहळ्याला दिमाखात प्रारंभ झाला आहे. हजारो भाविकांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या असून, विठ्ठल भेटीची आतुरता आणि आसक्ती प्रत्येक भाविकाच्या डोळ्यांत दिसून येत आहे. देशभरातील विठ्ठल भक्तांना घरसबल्या श्रींचे लाईव्ह दर्शन घेता यावे यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने टाटा स्कायसोबत करार केला होता. त्यानुसार टाटा स्काय डिशच्या सेवाधारकांना घरबसल्या टीव्हीवर श्रींचे 24 तास दर्शन होत होते.

आता मंदिरे समितीने याबाबत नव्याने राबविलेल्या प्रक्रियेनुसार टाटा स्कायसोबतच जिओ टीव्हीलाही श्री विठ्ठलाच्या लाईव्ह दर्शन प्रसारणाचे हक्क बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता केवळ देशातीलच नव्हे जगभरातील लाखो-करोडो भाविकांना आपल्या मोबाईलवर जिओ टीव्हीच्या माध्यमातून श्री विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन घेता येणार आहे. या प्रसारण हक्काबाबत मंदिरे समितीने टाटा स्काय आणि जिओ टीव्हीशी करार केला असून, या नव्या कराराच्या माध्यमातून या कंपन्यांकडून येत्या 3 वर्षात मंदिरे समितीला एकूण 1 कोटी 25 लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे.

येत्या आषाढी एकादशीपासून जिओ टिव्हीवर श्री विठ्ठल दर्शन या स्वतंत्र भक्ती चॅनेलचा प्रारंभ होणार असून, या चॅनेलच्या माध्यमातून भाविकांना थेट मोबाईवर श्रींचे लाईव्ह दर्शन पूर्णपणे मोफत घेता येणार आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे घराघरांतील नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना आषाढीसह अन्य दिवशीही श्रींच्या दर्शनाचा लाभ घेता येणार असल्याचे ना. डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: