श्री क्षेत्र कांदलगांव येथे आज नरसिंह जयंतीचा मुख्य सोहळा

बार्शी:

तालुक्यातील कांदलगांव येथे ग्रामदैवत नरसिंहाच्या जयंती (यात्रा) निमित्त गेल्या 6 सहा दिवसांपासून नवरात्रोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह सुरु असून आज शुक्रवार दि. 17 रोजी सूर्यास्ताच्या वेळी नरसिंह जयंतीचा मुख्य सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष हरिदास फुरडे पाटील यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना सरपंच प्रदीप नवले म्हणाले की, गावात शनिवार दि. 11 मे पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. यामध्ये अनुक्रमे लक्ष्मण महाराज मांजरे, विलास पिंगळे, सरदार गव्हाणे, नरहरी नवले, विठ्ठल करडे, हरिभाऊ खैरे यांची प्रवचने तर पांडुरंग लोमटे महाराज, विलास पिंगळे, मारुती हाहुळ, श्रीमंत नाईकवाडी, दत्तात्रय मोरे, जालिंदर महाराज चौधरी यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. 

शुक्रवारी सायंकाळी कांदलगांव परिसरातील हजारो भक्तांच्या उपस्थित जयंतीचा मुख्य सोहळा (गुलालाचा कार्यक्रम) संपन्न होणार आहे तर रात्री महेश वेरुळकर यांचे कीर्तन होणार आहे तर शनिवार दि. 18 रोजी सीतारामगडाचे प्रमुख ह.भ.प. महालिंग महाराज पंढरपूरकर यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर नरसिंह युवक मंडळाच्यावतीने काल्याचा महाप्रसाद होणार आहे तर रात्री शेरणी वाटपाचा कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्री देवाची पालखी (छबीना) निघणार आहे. तीन दिवस चालणार्‍या या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बालाजी करडे, सोसायटी चेअरमन आप्पासाहेब फुरडे, उपसरपंच कैलास फुरडे यांनी केले आहे. 

admin: