बार्शीत  भगवंत जयंती निमित्त महापूजा, शोभायात्रा आणि महाप्रसाद मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा


गणेश भोळे/ प्रशांत खराडे

बार्शी  ः बार्शीचे ग्रामदैवत श्री.भगवंत प्रकट दिनानिमित्त गुरूवारी (ता.16) सकाळी सात वाजता भगवंत देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त नाना सुरवसे यांनी सपत्नीक भगवंताची महापूजा केली.  जयंती निमित्त भगवंत लक्ष्मीची सोन्याचे अलंकार घालून तुळशीमाळासह आकर्षक पूजा बांधण्यात आली होती.

 यावेळी देवस्थान पंच समितीचे सरपंच दिलीप बुडूख, मिठू सोमाणी, हंसराज झंवर व ट्रस्टी तसेच बडवे समितीचे सदस्य उपस्थित होते. भगवंत प्रकट दिन अर्थात जयंती निमित्त भगवंताच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासून नागरीकांनी मंदिरात गर्दी केली होती.

प्रकट दिनानिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षीही मंदिरात पहाटे साडेचार  वाजता गुरुवर्य जयवंत महाराज बोधले यांची  कीर्तन सेवा संपन्न झाली.धर्म रक्षावया अवतार घेशी या  अभंगावर  निरूपण करताना महाराजांनी धर्म आणि भक्तांच्या रक्षणासाठी भगवंत अवतार घेऊन कार्य करतात असे सांगितले.यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.

सूर्योदयावेळी प्रकटोत्सव फुले टाकून साजरा झाला. त्यानंतर सकाळी साडे आठ वाजता भगवंत मंदिरापासून भगवंताच्या उत्सवमूर्तीची फुलांनी आकर्षकरित्या सजवलेल्या उत्सव रथातून शोभा यात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेची सुरवात बार्शी बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत व सरपंच दिलीप बुडूख, नगराध्यक्ष अ‍ॅड.असिफ तांबोळी यांच्या हस्ते श्रींची आरती करून झाली. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, भगवंत महोत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक सुभाष लोढा, सचिव संतोष सूर्यवंशी, नगरसेवक विजय राऊत, दीपक राऊत, संतोष बारंगुळे, मदन गव्हाणे, विजय चव्हाण, समिती सदस्य अजित कुंकूलोळ, श्रीधर कांबळे, रावसाहेब मनगिरे, अभिजीत सोनिग्रा, तुकाराम माने, सचिन मडके, भरतेश गांधी, दामोदर काळदाते,प्रशांत खराडे भगवंत देवस्थान समितीचे सदस्य, भगवंत भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भगवंत मंदिरापासून सुरू झालेल्या शोभा यात्रेत दुर्वास भजनी मंडळ, नरेंद्राचार्य महाराज सेवक संघाच्या महिलांचे लेझिम पथकासह वारकरी मंडळी भगव्या पतकासह सहभागी झाले होते.

 ही शोभा यात्रा भगवंत मंदिरापासून महाव्दार चौक मार्गे चाटी गल्लीतून सावरकर चौक मार्गे पान खुंट येथून टाकणखार रोड, शाहिर अमर शेख चौक, पांडे चौकातून पुढे भगवंत मंदिरपाशी विसर्जित करण्यात आली. शोभा यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. शोभा यात्रा पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती. दरम्यान शोभा यात्रेत रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

महिलांचे लेझिम पथक शोभा यात्रेचे आकर्षण ठरले.. बार्शीतील नरेंद्राचार्य महाराज सेवक संघाच्या महिलांनी भगवे फेटे बांधून हिरव्या रंगाच्या साडी परिधान करून आकर्षक रित्या लेझिम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. दरम्यान भगव्या पताका व ध्वज घेऊन सामील झालेले पारंपारिक वेषभूषेतील दुर्वास भजनी मंडळासह अन्य भजनी मंडळानी रंगत आणली. आषाढी एकादशी निमित्त भगवंताच्या पंचधातूच्या उत्सवमूर्तीची सागवानी रथातून मिरवणूक काढली जाते त्यानंतर भगवंत प्रकट दिनानिमित्तही उत्सवमूर्तीची उत्सव रथातून मिरवणूक काढण्यात येते. 


जयंती निमित्त महाप्रसाद वाटप..

 महोत्सव समितीच्या वतीने मॉडेल हायस्कूलच्या प्रांगणात भव्य शामियाना उभारून भाविक भक्तांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. महाप्रसादासाठी दानशूर व्यक्ती, संस्था,संघटना व भगवंत भक्तांनी आर्थिक मदतीसह धान्यरूपात मोठी मदत केली. दुपारी बारा ते चार या दरम्यान महाप्रसादाचा हजारो भाविकांनी आस्वाद घेतला.

फुगडीची आठवण अन बोधले महाराज-राऊत फुगडी

गेल्या वर्षी आडआमदार दिलीप सोपल व राजेंद्रराऊत हे दोघे फुगडी खेळली होते. यंदा मात्र सोपल  दिंडीत सहभागी झाले नाहीत. त्यामुळे मंदिरात राजेंद्र राऊत व जयवंत बोधले महाराज हे दोघे फुगडी खेळले.मात्र काहीही असो गेल्या वर्षीच्या फुगडीची यंदा बार्शीकरांना आठवण झाली हे खरे.

admin: