कार्यकर्ता जपणारा लोकनेता – देवेंद्रजी फडणवीस

कार्यकर्ता जपणारा लोकनेता – देवेंद्रजी फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे राज्याला लाभलेले लोकनेते आहेत. त्यांच्या कार्यातून त्यांनी अनेक गोष्टी समोर आणल्या, त्यांच्या वाढदिवसानिमित्त लेखातून त्यांना शुभेच्छा देत असताना मला संघटनेतील माझे जुने दिवस आठवतात. पहिल्यांदा मी त्यांना पाहिलं होतं, तेव्हा ते महापौर होते. त्याच दरम्यानच्या काळात भेटही झाली आणि ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष झाले होते, त्याचवेळी मी उत्तर सोलापूर तालुक्याचा भारतीय जनता युवा मोर्चाचा तालुकाध्यक्ष झालो होतो. तेव्हापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करता आले हे माझे भाग्य समजतो. कारण सोबतच्या सहकाऱ्याला ताकद देणं, त्याची आपुलकीने चौकशी करणं, कामासाठी बळ देणं हे काम ते सदैव करत असतात.

तेव्हाही आम्ही भाजयुमोच्या कामात सक्रिय असताना त्यांच्या संघटन कौशल्याचा प्रत्यय आम्हाला आला होता. नंतर ते आमदार झाले आणि संघर्ष करत करत पुढे राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष झाले. आणि योगायोग असा की मीही तेव्हा भारतीय जनता पार्टीचा सोलापूरचा जिल्हाध्यक्ष झालो. आणि अजून चांगले सोबत काम करता आले. जेव्हा ते प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा प्रचंड प्रवास आणि दौरे करायचे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरायचे, लोकांना भेटायचे आणि सोबतच्या कार्यकर्त्यांनाही हवे नको ते बघत आस्थेने विचारपूस करायचे.

प्रदेश कार्यलयाच्या त्यांच्या दालनात भेटण्यासाठी बसल्यावर राज्यातल्या कोणत्याही कोपऱ्यातला कार्यकर्ता असो त्याची अडचण समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना सुरुवातीला काही अडचणी असायच्या तेव्हा ते व्यवस्थित मार्गदर्शन करायचे. नंतर जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या विकसनशील नेतृत्वाची झलक राज्याला झाली. खऱ्या अर्थाने त्यांच्यात असलेल्या कामाच्या गुणवत्तेचे दर्शन राज्याला झाले. माझं भाग्य असे की मी ते मुख्यमंत्री झाल्यानंतरही जिल्हाध्यक्ष होतो.

सत्तेतला जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना लोकांच्या अपेक्षा असायच्या, कार्यकर्ते अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी यायचे.

या काळातली मला एक गोष्ट चांगली आठवते. एका कार्यकर्त्याची अडचण होती, मी तसा एक मेसेज रात्री त्यांना टाकला आणि 15 मिनिटात त्यांचा ओके असा रिप्लाय आला. आणि एक तासाच्या आतमध्ये त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा फोन त्या कार्यकर्त्याला आला आणि 24 तासाच्या आत तो प्रश्न मार्गी लागला. केवळ एका मेसेजवर इतके गतिमान काम त्यांनी केले. हे केवळ माझेच उदाहरण नाही तर राज्यातल्या अनेकांची कामे त्यांनी याच पद्धतीने केली आहेत. ही त्यांची कामाची पद्धत अनेकांना आनंद देणारी आहे.

देवेंद्रजींचे राजकीय पैलू तर आहेतच मात्र माझ्यासाठी भावनिक विषय म्हणजे त्यांना माझ्या घरचे आवडणारे जेवण आहे. एकदा देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौऱ्याला आले होते, मी जिल्हाध्यक्षच होतो तेव्हा त्यांचे माझ्या घरी जेवण झाले. आणि त्यांना ते जेवण खूप आवडले त्यानंतर ते जेव्हा जेव्हा सोलापूर दौऱ्याला आले तेव्हा आवर्जून ते त्यांच्यासाठी मला घरून जेवणाचा डबा आणायला सांगतात. एकदा तर त्यांचे डायट सुरू होते, तेव्हा सोलापूरला आणि जेवण आणायला सांगितल्यानंतर त्यांचा कुक माझ्या घरी आला मात्र त्यांनी सांगितले “मला पवार वहिनींच्या हातचे जेवण आवडते त्यामुळे घरचाच डबा आणा.”

इतका सहज, साधा आणि कार्यकर्त्यांशी जवळीक ठेवणारा, त्यांना जपणारा नेता राज्याच्या राजकारणात दुसरा नाही. मुळात मी तर म्हणतो देवेंद्रजी हे जे काही कृतीतून करतात ते केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, म्हणूनच करू शकतात, कारण त्यांनी आयुष्यभर सार्वजनिक जीवनात राज्याच्या सर्वोच्च पदावर गेल्यावरसुद्धा आपल्यातला स्वयंसेवक, आपल्यातला कार्यकर्ता जिवंत ठेवला आणि जपला हे महत्वाचे आहे.
भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता जर धडपड करत असेल, पक्षासाठीच नव्हे तर समाजासाठी चांगलं आणि विधायक काम करत असेल तर त्याला बळ दिले पाहिजे, प्रोत्साहन दिले पाहिजे हा त्यांचा स्वभाव मी अनुभवला.

मुख्यमंत्री असताना सोलापूरला विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त देवेंद्रजी दोऱ्यावर आले होते, मुख्यमंत्री म्हणल्यानंतर पूर्ण दौरा व्यवस्थित अगोदरच ठरवलेला असतो, सुरक्षेच्या कारणामुळे त्या व्यतिरिक्त कार्यक्रम करता येत नाहीत.

अक्कलकोटमध्ये सचिन कल्याणशेट्टी यांनी आपल्या स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या मार्फत सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. मात्र देवेंद्रजींच्या दौऱ्यात तो कार्यक्रम नव्हता, अनेकजण देवेंद्रजींनी अक्कलकोटला त्या कार्यक्रमाला जाऊ नये यासाठी प्रयत्न करत होते, मात्र त्या दिवशी मी गाडीत असताना देवेंद्रजींना सचिन कल्याणशेट्टी यांच्या कामाची माहिती दिली, पक्षाबद्दलची आणि सामाजिक कामाची तळमळ सांगितली आणि दोन मिनिटे भेट देण्याची विनंती केली.

तेव्हा कशाचाही विचार न करता त्यांनी तातडीने आपला ताफा अक्कलकोट घ्यायला लावला आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि शुभेच्छा दिल्या. तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची त्याची कामाची ही पद्धत कुशल संघटकपणा दर्शवतो.

ज्या पक्षाने आपल्याला मुख्यमंत्री पदावर बसवले त्या पक्षाने सांगितले म्हणून उपमुख्यमंत्री पद स्वीकारणारे देवेंद्रजी हे आजच्या राजकारणातले आदर्श उदाहरण आहेत. आपल्या पक्षाबद्दलची निष्ठा आणि त्याग त्यांनी देशाला आपल्या कृतीतून दाखवला.

माझ्याकडे सूत्रे आल्यावर चार महिन्यात ओबीसी आरक्षण देईन, नाही तर राजकीय संन्यास घेईन असा जाहीर आव्हान दिले होते आणि त्यांच्या अभ्यासूपणामुळे सत्तेत आल्यावर केवळ 15 दिवसात ओबीसी राजकीय आरक्षण मिळाले. “बोले तैसा चाले, त्याची वृंदावी पाऊले” या ओळ त्यांच्या नेतृत्वाला चपखल बसतात.

त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मी 7 जुलैला त्यांना भेटण्यासाठी शासकीय निवासस्थानी गेलो, स्वीय सहाय्यकांना भेटण्याच्या वेळेविषयी विचारणा केली होती, मात्र समनव्य न झाल्याने मला भेटता आले नाही, मी देवेंद्रजींना तसा एक मेसेज केला आणि त्यांनंतर आठव्या मिनिटाला त्यांचा फोन आला, आणि त्यांनी सध्या पदग्रहणसाठी मंत्रालयात आलो आहे, मला तुमच्या भेटण्याबद्दल स्वीय सहाय्यकांचा काही निरोप नव्हता मात्र तुम्हाला भेटण्याची वेळ मिळेल असे आश्वस्त केले, आणि काही वेळेनंतर स्वीय सहाय्यकांचा फोन आला आणि चक्क दिलगिरी व्यक्त करत मला त्यांनी सायंकाळी 9 वाजता भेटायला बोलावले असल्याचे सांगितले.

त्याच रात्री माझी देवेंद्रजींसोबत व्यवस्थित भेट झाली. त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्यात एकीकडे एकीकडे नेता आमदार, खासदारांना भेटत नाही म्हणून पक्ष फुटत असताना केवळ एका मेसेजवर फोन करून भेट देणारा हा आमचा नेता आत्मीयता आणि सहजता दाखवून देतो.

पुन्हा एकदा राज्यात त्यांच्या अभ्यासू आणि पारदर्शक नेतृत्वात भाजपा – शिंदे सरकार आले आहे. महाराष्ट्र समृद्धीचे काम गतीने सुरू झाले आहे. अशा या महान लोकप्रिय नेत्याला उदंड आयुष्य लाभो हीच प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना करतो.!

– शहाजी पवार,
सदस्य, भाजपा प्रदेश कार्यकारिणी, महाराष्ट्र

ग्लोबल न्युज नेटवर्क: