शोभत कां ?
‘ शोभत का हे या वयाला ? ‘ हे वाक्यच मुळात चुकीचं आहे . फारफारतर ‘झेपेल का हे या वयाला ?’ हे एकवेळ चालेल…. पण वयाचा आणि शोभण्याचा काय संबंध आहे बुवा ! 4-5 वर्षाची मुलं जेव्हा यु – ट्युब व्हिडिओवर घडाघडा जगाचे नकाशे वाचताना दिसतात
किंवा त्या सारेगमप सारख्या कार्यक्रमात 7-8 वर्षाच्या चिमुरड्या मुली दिग्गजांनाही लाजवेल इतक्या सहजतेने शास्त्रीय संगीताच्या ताना घेतात , तेव्हा विचारतो का हो आपण हा प्रश्न ‘शोभत का हे या वयाला ? ‘ ..तेव्हा कौतुक करतो . पण साधारण वयाची पन्नाशी ओलांडली कि मग मात्र त्या व्यक्तीकडे बघण्याची आपली दृष्टी अशी का बदलते ?
एकदा एका परिचितांच्या घरी पार्टीला गेलो होतो. बराच मोठा गोतावळा होता. डि.जे. लावून तरूण मंडळी नाचत होती. इतक्यात माझ्या बाजूला उभ्या असलेल्या एका साठीच्या आसपासच्या सद्गृहस्थांनी गळ्यातला टाय काढला , कोट काढून बायकोच्या हातात दिला आणि ती काही बोलायच्या आत ते सरळ त्या गर्दीत घुसले.
पुढचा अर्धा पाऊण तास पार ‘ शम्मी कपूर ‘ ते जमिनीवर गडाबडा लोळून ‘ नागिन डान्स ‘ इथपर्यंत यथेच्छ नाचून झालं. मी कुतूहलाने आजूबाजूच्या
चेहेऱ्यांवरचे भाव बघत होतो . सगळ्यात अवघडलेला चेहेरा होता तो त्यांच्या बायकोचा … माझ्या नजरेला नजर भिडताच त्या कसनुसं हसल्या .बाकी नव्वद टक्के मंडळी ‘ फुकट मनोरंजन होतय , होऊ दे ‘ या अविर्भावात होती.
मला कौतुक वाटलं ते त्या डान्स फ्लोअरवरच्या तरूण मंडळींचं . त्यांनी इतक्या पट्कन त्या गृहस्थांना ‘ आपलं ‘ म्हटलं , नाच संपल्यावर तर एका – दोघांनी त्यांना ‘ काका , मस्तच’ म्हणून मिठ्या पण मारल्या . ते गृहस्थ परत येऊन कोट घालत होते तेव्हा मी स्वतःहून जाऊन त्यांच अभिनंदन केलं..ते मोकळेपणाने हसत म्हणाले ,”खूप वर्षांपासूनची इच्छा होती रे, मानेवरची नको ती जोखडं फेकून द्यायची..
आज सुरवात केलीय , अजून बरच काही करायचं बाकी आहे”. पण शेवटी ते वाक्य आलंच … बायको चिडून बोलली , ”शोभत का हे या वयाला… स्वतःचा नाही पण आमचा तरी विचार करत जा !”…मी अंतर्मुख झालो..हि कसली बंधन घालून घेतली आहेत आपण..आयुष्य छोटं आहे आणि ते वेगाने पूढे सरकतय..मग ते जगायचचं विसरतोय का आपण?
हे खरं आहे की चिरतरूण कोणीच नाही , पण अस म्हणतात की माणसाचं वय हे मानण्यावर असतं . शारिरीक मर्यादा हळूहळू येणार , त्याला पर्याय नाही पण मनाला काही वय नसतं हो.. त्याने तरूणच रहायला काय हरकत आहे ! आणि खरं सांगू का,ही अशी साठीतली तरूणाई आजूबाजूला बघितली नं की खूप बर वाटतं .
ही मंडळी तोकडे कपडे घालतात , दोरीच्या उड्याही मारतात आणि कवळ्या संभाळत एकमेकांचे मुकेही घेतात…. शोभतं की त्यांना सगळं ,कारण तरूणच आहेत नं ते !
"आयुष्यात येणार प्रत्येक नवं वर्षं म्हणजे वाढ असते....अनुभवात , समजुतदारपणात , उत्साहात आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे आयुष्याच्या मोहकतेत..''
या मोहकतेला वयाच्या आकड्याच्या रिंगणात नको अडकवूया , तिला तिचा सुगंध पसरवायचं स्वातंत्र्य देऊया.... आयुष्य सुंदर आहे , ते मनासारखं जगूया.आणि जगू देऊया . खरं नं !
जगाला हेवा वाटेल असे जगा
जियो मेरे दोस्तो
लेखक माहीत नाही साभार फेसबुक