मुंबई | निवडणुकांचे निकाल लागून 11 दिवस उलटले आहेत. मात्र राज्यामध्ये सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे तर भाजपही आपल्या मतावर ठाम आहे. दरम्यान भाजप-शिवसेना युतीमध्येच संख्याबळाची शर्यत गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. शिवसेनेत आता आणखी एका अपक्ष आमदाराची भर पडली आहे. सेनेचे संख्याबळ 64 झाले आहे.
कोल्हापूरच्या शिरोळ मतदार संघातील अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी सोमवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. त्यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती. पुढील काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचं यावेळी राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी सांगितलं आहे. यासोबतच, राज्यातील शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय, गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा आणि बेरोजगार युवकांना रोजगार शिवसेनाच मिळवून देऊ शकते हा विश्वास आहे. यामुळे शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचंही पाटील म्हणाले.