शिवसेना नो टेन्शन मोडमध्ये;तर नेतेमडळी म्हणतात…

मुंबई । विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस उलटले तरी राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेला अद्यापि मुहूर्त मिळालेला नाही, घोळ सुरूच आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असून गल्लीपासून दिल्लीपर्यंत धावाधाव सुरू आहे. मात्र सत्तावाटपाच्या फिफ्टी-फिफ्टी वाटपावर शिवसेना ठाम असल्याने भाजपने ‘ईडी’ वगैरे झाले, आता राष्ट्रपती राजवटीच्या धमकीचीच भाषा सुरू केली आहे. दुसरीकडे सत्तेचा रिमोट कंट्रोल हातात असलेली शिवसेना मात्र नो टेन्शन मोडमध्ये आहे. ना टेन्शन, ना घाई!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठरवले तर राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ठामपणे म्हटले आहे. शिवसेना-भाजपात फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर एकमत झाले होते आणि त्याप्रमाणेच सरकार यावे असे राज्यातील जनतेला वाटते. अर्थात त्यांच्याकडे बहुमत असेल तर त्यांनी सरकार स्थापन करावे. सरकार स्थापनेचा दावा करायचा की नाही हा त्यांचा लूकआऊट आहे, असेही खासदार राऊत म्हणाले.

विधानसभा निवडणूक निकालाने सर्वात जास्त जागा मिळवून भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हातात आहेत. सत्तावाटपाचा फॉर्म्युला फिफ्टी-फिफ्टीच असेल असे आश्वासन देऊनही ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटी मारल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना-भाजपची बैठकच रद्द केली. समान सत्तावाटपावर शिवसेना अधिकच आक्रमक आणि ठाम झाल्याने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवट लागू करू, अशी धमकीच दिली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, 7 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल.

भाजपची शपथविधीची तयारी; ‘वानखेडे’ आरक्षित

एकीकडे राष्ट्रपती राजवटीचा इशारा देणाऱया भाजपने सत्तास्थापनेची तयारीही केली आहे. भाजपने शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम आरक्षित केले असून 5 नोव्हेंबर ही तारीखही मुक्रर करण्यात आली आहे. आज भाजप नेते आणि पोलीस अधिकाऱयांनी स्टेडियमची पाहणीही केली. याआधी महालक्ष्मी रेसकोर्स आरक्षित करण्याचे घाटत होते; पण पोलिसांनी नकार दिल्याने तो बेत रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पोरखेळ थांबवा!

अयोध्या निकालापूर्वी भाजप-शिवसेनेने राज्यात सुरू केलेला सत्तास्थापनेचा पोरखेळ थांबवावा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेत्यांची कानउघाडणी केली आहे. सरकार स्थापनेसाठी भाजपकडे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसून त्यांनी कितीही अपक्ष उमेदवारांना हाताशी धरले तरी ते बहुमताचा आकडा गाठू शकतील असे वाटत नाही. हे लक्षात घेता भाजपला शिवसेनेच्या मागण्या मान्य कराव्या लागतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

भाजपने फसवले!

भाजपाने शिवसेनेची फसवणूक केली आहे. निवडणूक होऊन आठ-दहा दिवस झाले असले तरी अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. याला केवळ भाजपाचेच धोरण जबाबदार असल्याचे काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याकरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू असलेल्या वादावादीवर काँग्रेसची बारीक नजर आहे. काँग्रेसचे नेतृत्वही या सगळ्या गोष्टींची माहिती घेत असून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. आमची सध्याची भूमिका ही वेट अँड वॉचची असल्याचे चव्हाण म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: