शिक्षण संस्था चालक-शिवसेना उपनेते ते कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांचा चढता राजकीय आलेख

प्रशांत खराडे

पुणे : शिवसेनेतील अवघ्या तीन वर्षाच्या कार्यकाळात सोलापूर जिल्ह्यातील तानाजी सावंत यांनी विधानपरिषद सदस्य, शिवसेना उपनेते ते आता राज्यमंत्री मंडळात कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे. 

मूळ सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील तानाजी सावंत व माजी जिल्हाप्रमुख शिवाजी सावंत यांनी पुणे व परिसरात जेएसपीएम ही शिक्षण संस्था नावारूपाला आणली. नंतर त्यांनी सोनारी ता परंडा येथे खाजगी साखर कारखाना सुरू केला.भैरवनाथ शुगर या नावाने मंगळवेढा, परंडा, वाशी, करमाळा आदी तालुक्यात खाजगी साखर कारखाने काढून ते चालवून दाखवले.

तीन वर्षापुर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. लगेच त्यांनी यवतमाळ- वाशिम मतदारसंघातून विधान परिषदेचे तिकीट मिळवले. ती निवडणूक मोठ्या मतांनी जिंकली. पुढे दिवसेंदिवस उद्धव ठाकरे यांचा तानाजी सावंत यांच्यावरील विश्वास वाढत गेला. त्यांना उपनेते पदाचा दर्जा देऊन सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बनवण्यात आले. मध्यंतरी पंढरपुरात सावंत यांनी उद्घव ठाकरेंचा मोठा मेळावा यशस्वी केला. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच आग्रहावरून उस्मानाबादची उमेदवारी बदलण्यात आली. तो निर्णय सावंत यांनी ओमराजे निबाळकर यांना विजयी करून यशस्वी करून दाखवला. या पद्धतीने यशाचा चढता असलेल्या सावंत यांनी राज्य मंत्रीमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून आज शपथ घेतली.

अवघ्या तीन वर्षात त्यांनी घेतलेली झेप अचंबित करणारी आहे. सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील असल्याने व त्यांचे कार्यक्षेत्र हे उस्मानाबाद आणि यवतमाळ असल्याने त्यांच्या मंत्री पदाचा आनंद हा तीन जिल्ह्यात साजरा होत आहे.

बातम्यांच्या अपडेट्स साठी ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

धिरज करळे: