शरद पवार म्हणतात, चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करायला 10-12 वर्ष लागतील
मुंबईः आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुलाखतीला सडेतोड उत्तर दिली. दरम्यान त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खोचक टोलाही लगावला आहे. चंद्रकांत दादांना माझ्यावर पीएचडी करायची असेल, तर त्यांना 10 ते 12 वर्षे वेळ काढावा लागेल, असे शरद पवार म्हणालेत.
मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने संवाद साहेबांशी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तरुण पिढीसोबत संवाद साधला. युवा पिढीसोबत बोलण्याची संधी मिळाली याचा शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी शरद पवार यांची मार्गदर्शनपर मुलाखत घेण्यात आली. पवारांनी त्यांचा आमदारकीचा अनुभव तरुणांना सांगितला. तसंच मुलाखतीत अत्यंत दिलखुलास पद्धतीनं उत्तरं दिली.
माझं वय 80 वर्षांचं तरी विचार करण्याची प्रक्रिया 80 वर्षांपर्यंत गेली नाही. 52 वर्षांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेत वयाच्या 26व्या वर्षी प्रथम निवडून आलो. हे सांगायचं कारण केवळ हेच आहे की 26व्या वर्षी देखील आपण विधानसभेत निवडून येऊ शकतो हा पर्याय तुम्हाला कळायला हवा, असं पवार यांनी म्हटलं.
५० लोक याविषयी बोलत आहेत
यावेळी पवारांनी त्यांचे महाविद्यालयीन काळातील अनेक अनुभव मुलांसोबत शेअर केले. सार्वजनिक जीवनाची सुरूवात कॉलेज विश्वापासून होते. तेव्हा अभ्यास सोडून सगळ्यात भाग घ्यायचो. माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात यामुळेच झाली. मात्र त्यावेळेस जोडलेली मैत्री मी आजही जपून आहे. आजही माझ्या महाविद्यालयीन मित्रांना भेटतो, असं पवार म्हणाले.