शरद पवारांना सोडण्याचा गम नाही, पण हूर हूर वाटते:दिलीप सोपल

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आज दि.28 रोजी  मातोश्रीवर जाऊन हातात शिवबंधन बांधून भगवा झेंडा खांद्यावर घेतला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत निवडक  कार्यकर्त्यांसह सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी  जलसंधारणमंत्री आणि सोलापूरचे सहपालकमंत्री तानाजी सावंत, उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे ही उपस्थित होते. प्रवेशानंतर बोलताना, 23 वर्षांनी आपण घरवापसी केल्याचं सोपल यांनी म्हटलं. दरम्यान, आमदार सोपल हे 1995-99 मधील युती सरकारच्या काळात विधी व न्यायमंत्री होते. त्यावेळी, अपक्ष आमदार असताना सोपल यांनी सहयोगी सदस्यत्व  घेत शिवसेनेला पाठिंबा दिला होता.


प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनीही सोपल यांचे स्वागत केले. तसेच, दिलीप आमचे जुने सहकारी आहेत, काही कारणास्तव ते गेले होते. पण, आता मोठ्या ताकदीने ते पुन्हा सेनेत आले आहेत. ब्रेक के बाद… ब्रेक के बाद… असे प्रवेश होत आहेत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. 

आमदार सोपल यांनीही राष्ट्रवादीला रामराम केल्याचं दु:ख नाही, असे म्हटलं आहे. शरद पवारांना सोडण्याचा गम नाही, पण हूर हूर वाटते, अशा शब्दात सोपल यांनी राष्ट्रवादीच्या सोडचिठ्ठीवर आपली प्रतिक्रिया दिली.


तसेच, मी 23 वर्षांनी घरवापसी केली आहे. मित्रांनी आणि कार्यकर्त्यांनी मला हा निर्णय घेण्यास सांगितले. म्हणूनच, मी शिवसेना प्रवेश केला. आता, शिवसेनेकडून बार्शी मतदार संघातून मी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे, असेही सोपल यांनी म्हटले. राज्य सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भातही सोपल यांनी स्पष्टीकरण दिले. माझा शिवसेना प्रवेश निश्चित झाल्यानंतरच, मला नोटीस देण्यात आली. त्यापूर्वी मला नोटीस आली नव्हती, असेही सोपल यांनी म्हटले. 

दिलीप सोपल यांनी आपल्या सोपल बंगला येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपण शिवसेना प्रवेश करत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर, मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या औरंगाबाद येथील घरी जाऊन उद्योग मंत्री सुभाष देसाई व मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणासाठी आपण राजीनामा देत असल्याचं सोपल यांनी म्हटलं होतं. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही सोपल यांचा राजीनामा मंजूर केला होता. आता, बुधवारी सोपल यांनी मातोश्रीवर जाऊन आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. 

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.


ग्लोबल न्युज नेटवर्क: