व्यवस्थेला आव्हान असलेल्या मटका, दारू, वाळू आदी अवैध व्यवसाय करणाऱ्याना फोडून काढा – पोलीस अधिक्षक मनोज पाटील 

व्यवस्थेला आव्हान असलेल्या मटका, दारू, वाळू आदी अवैध व्यवसायाला फोडून काढा – पोलीस अधिक्षक मनोज पाटील 

बार्शी :कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीकोनातून आता आपण निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. पुढचा काळही तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. शहरातील प्रवासी वर्दळ कमी करण्याकडे आणखी लक्ष दया. शेतीसाठी व अत्यावश्यक कामासाठी सवलत दया. व्यवस्थेला आव्हान असलेल्या मटका, दारू, वाळू आदी अवैध व्यवसायाला फोडून काढा असे निर्देश सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बार्शी शहर पोलीस स्टेशनला भेट देवून तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिध्देश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहूल देशपांडे, पांगरीचे सपोनि सचिन हुंदळेकर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, आपण आता निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. लगतच्या जिल्हयात बाहेरून कोरोना केसेस आल्या आहेत. त्यामुळे दळणवळण थांबवावे लागेल. एखादी केस आली तर मानसिक दबाव निर्माण होतो. संशयाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे सोलापूर जिल्हयात कोरोना न येणे हे आपल्यासाठी मोठी बाब आहे.

जिल्हा हद्द ओलांडून बेकायदा कोण आले तर कारवाई करा. अशांचे मेडिकल चेकअप करून क्वारंटाईन करण्याबाबत पहा. दुचाकी, कार अशी प्रवासी वर्दळ कमी करण्याकडे आणखी लक्ष दयावे. शहरातील रस्त्यांवर मोटारसायकलींची संख्या जास्त दिसत आहे. ती कमी करा. विनाकारण फिरणारांना कांही काळ स्थानबध्द करा. शेतीसाठी व अत्यावश्यक कामासाठी, शेतमाल वाहतूकीसाठी सवलत दया. परंतु एका वाहनात चालक व एकजण असावा. स्वस्त धान्य दुकानात व बँकामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी संबंधितांशी संवाद साधून सोशल डिस्टसिंग पाळण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक दक्षता घ्या अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकारी यांना दिल्या.

 बार्शी तालुकावासियांना आवाहन

सोशल डिस्टसिंग आणि लॉकडाऊनला बार्शी तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरीसुध्दा कांही लोक विनाकारण रस्त्यावर येताना दिसत आहेत. विनाकारण बाहेर पडू नका. शक्यतो चालत जा. दुचाकींचा वापर टाळा. अत्यावश्यक माल वाहतूकीसाठी, शेतीमालासाठी पोलीस सहकार्य करतील. पुढील कांही दिवस आपल्याला घरात थांबावे लागेल. सर्वांसाठी ते आवश्यक आहे. जिल्हयातील नागरिकांच्या सहकार्यामुळेच आजपर्यंत सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त ठेवू शकलो. यापुढेही असेच सहकार्य आपल्याकडून मिळावे असे आवाहन करत जिल्हावासियांनी सहकार्य केल्यास निश्चितपणे जिल्हा शेवटपर्यंत १०० टक्के कोरोनामुक्त ठेवून जिल्हावासियांना योग्य दिलासा व आरोग्य देवू शकू असा विश्वास पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: