चिंताजनक: राज्यात आणखी रुग्ण वाढले, पाहा आजचा आकडा किती

मुंबई: राज्यात आज पुन्हा एकदा  कोरोना रुग्ण   वाढतच आहे. गेल्या २४ तासात राज्यात तब्बल ११७ नवे रुग्ण सापडले आहेत. या सर्वांची चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही ११३५ एवढी झाली आहे. तर आजच्या संपूर्ण दिवसात राज्यात ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व रुग्ण पुण्यातील असल्याची माहिती मिळते आहे. 


काल (सोमवार) राज्यात एकूण १०१८ रुग्ण होते. मात्र, आता दिवसभरात ११७ रुग्ण वाढल्याने राज्यातील रुग्णांची संख्या ही ११३६ एवढी झाली आहे. आज राज्यात ८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत राज्यातील मृतांचा आकडा हा ७२ झाला आहे. अशी माहिती राज्य आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 

पुण्यात एकाच दिवसात ८ जणांचा मृत्यू

एकट्या पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १६ वर पोहोचली आहे. पुणे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरात रोजच्या रोज नव्या रुग्णांची नोंद होत आहे. काल मध्यरात्रीनंतर ९ नवे रुग्ण आढळून आले. नायडू, ससून आणि हडपसर येथील नोबेल रुग्णालयात बहुतांश कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. त्यातील आठ जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात ससून रुग्णालयातील तिघांचा समावेश आहे. मृतांमध्ये एक ५० वर्षीय महिला आहे. अन्य दोघे हडपसर आणि कोंढाव्यातील राहणारे होते. यापैकी एकाचे वय ५४ तर दुसऱ्याचे वय ७१ वर्षे होते.

देशातील रुग्णांचा आकडा ५ हजारच्या पुढे

देशात कोरोना बाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या ही ५००० च्या पुढे गेली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना बाधितांची संख्या ही ५२७४ एवढी झाली आहे. यामध्ये आतापर्यंत ४११ रुग्ण बरे होऊन आपआपल्या घरी परतले आहेत. तर १४९ जण मात्र या आजाराने दगावले आहेत. सध्या देशात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू आहे. देशभरात जे नवे रुग्ण समोर येत आहेत त्यापैकी अनेक रुग्ण हे तब्लीगी जमातशी निगडीत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: