वैष्णवांच्या मांदियाळीसह माऊलींचा सोहळा बरड मुक्कामी,आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

बरड/औदुंबर भिसे

उंच पताका झळकती |
टाळ, मृदुंग वाजती ॥
आनंदे प्रेमे गर्जती |
भद्र जाती विठ्ठलाचे ॥

भागवत धर्माची पताका उंचावत टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करीत आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या माऊलींसह लाखो वैष्णवांचा मेळा आज (शुक्रवार) सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामी विसावला.

उद्या शनिवार दि.६ रोजी साधुबुवांच्या ओढ्यावरील धार्मिक विधीनंतर हा सोहळा धर्मपूरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल.
पहाटे पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांच्या हस्ते माऊलींची पूजा व अभिषेक घालण्यात आला. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी ६.३० वाजता हा सोहळा बरड मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.

ज्ञानेश्‍वर मंदिर येथे नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर बसस्थानक, श्रीराम साखर कारखाना, श्रीराम बझार, श्रीराम एज्युकेशन संस्था इत्यादिंच्या वतीने सोहळ्याचे स्वागत स्विकारून या सोहळ्याने फलटण नगरीचा निरोप घेतला. माऊलींचा पालखी सोहळा वटवृक्षाच्या गर्द झाडीतून वाटचाल करीत सकाळच्या न्याहरीसाठी ९ वाजता विडणी येथे पोहोचला. 

शेतामध्ये वारकर्‍यांनी सकाळची न्याहरी उरकली. विडणी ते पिंपरद या वाटचालीत वारकर्‍यांच्या स्नानासाठी पिंपरदचे प्रगतिशील बागायतदार बाळासाहेब घनवट, बाळासाहेब बोराटे व शामराव शिंदे यांनी शॉवरची सोय केली होती. या इंग्लिश स्नानाने वारकरी वारीच्या वाटचालीत सुखावून गेले होते. सोहळा दुपारचे नैवेद्य व भोजनासाठी दुपारी १२ वाजता पिंपरद येथे वाजता पोहोचला.

पिंपरद येथे श्री ज्ञानेश्‍वर महाराजांचे सेवेकरी, पुजारी व कर्मचारी यांच्यावतीने माऊलींना पनीर , आम्रखंड , पुरी , भाजी , दालफ्राय , पुलावा भात आदी पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले.

दुपारी दीड वाजता हा सोहळा भोजन व विश्रांतीनंतर निंबळक फाटा मार्गे सायंकाळी बरड येथे पोहोचला. या वाटचालीत ढगाळ व आल्हाददायक वातावरण होते. पंढरी समीप आल्याने वारकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. असंख्य वारकरी फलटणहून शिखर शिंगणापूरकडे मार्गस्थ झाले. 

त्यांनी शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचे दर्शन घेतले व ते पुन्हा बरड येथे वारीत सहभागी झाले. सायंकाळी बरड येथे सोहळा पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. रात्रभर बरडसह परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

माऊलींचा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

आळंदीहून निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा उद्या (शनिवार) दि.६ रोजी सकाळी ११ वाजता आपल्या वैभवी लवाजम्यासह धर्मपूरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. माऊलींच्या पालखी सोहळ्यासमवेत रथापुढे २७ दिंड्या तर रथामागे जवळपास २५० दिंड्या आहेत. सोहळ्यासोबत जवळपास दोन लाख वारकरी सहभागी झाले आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली केली आहे.  आरोग्य, पाणीपुरवठा, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. 
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा
ग्लोबल न्युज नेटवर्क: