वैरागात आता निंबाळकरासोबत कपिल कोरके ही राजेंद्र राऊतां सोबत
तालुक्यात राजकीय घडामोडी वेगवान
बार्शी – बार्शी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय घडामोडी चांगल्याच गतिमान झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब कोरके आणि माजी मंत्री ऍड. सोपल यांची भेट झाली, आणि दुसऱ्या दिवशी कोरकेंची दुसरी पिढी माजी आमदार राऊत यांच्यासोबत आली.कपिल कोरके यांनी अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या सोबत काम काम करत राजकीय करिअर करण्याचा निर्णय घेत आगळगाव येथे धडाकेबाज भाषण केले.
बार्शी विधानसभा निवडणूक तिरंगीवर आली असली तरी अंतिम टप्प्यात ती दुरंगीच होणार हे उघड आहे. दहा दिवसांवर मतदान आले असताना अतिशय वेगवान राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. वैरागात दोन दिवसांपूर्वी शिक्षणमहर्षी बाळासाहेब कोरके आणि माजी मंत्री ऍड. दिलीप सोपल यांची भेट झाली, आणि कोरके आता सोपलसोबत असल्याचे सोपलगटाकडून सांगण्यात आले.
शिवाय मकरंद निंबाळकर यांनी तर ऍड. सोपल यांच्याकडे जाहीर प्रवेशच केला. या घडामोडी ताज्या असतानाच माजी आमदार राऊत यांनी वैरागात जाऊन बाळासाहेब कोरके यांचे चिरंजीव कपिल कोरके,आप्पासाहेब साहेब कोरके यांचे चिरंजीव आनंद कोरके तसेच सरकार निंबाळकर यांना सर्वांना साक्षीने या निवडणुकीतील प्रचारासाठी आपल्यासोबत घेतले.
यानिमित्ताने राऊत यांनी या भागातील पकड आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. याचबरोबर बुधवारी रात्री आगळगाव येथील जाहीर सभेत बार्शीचे प्रकाश मनगिरे यांनीही राऊत यांच्याकडे जाहीर प्रवेश केला.
मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे तसे तालुक्याचे राजकारणही वेगवान होताना दिसते आहे. शिवसेनेचे उमेदवार ऍड. दिलीप सोपल , अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांच्यासह इतर सर्वच उमेदवार गतीने कामाला लागले आहेत.