वैभवी लवाजम्यासह ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात दाखल, पादुकांना नीरा स्नान

वैभवी लवाजम्यासह ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात दाखल, पादुकांना नीरा स्नान

आज पहिले उभे रिंगण

लोणंद/औदुंबर भिसे

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व गुरू हैबतबाबा यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्याने दुपारी प्रवेश केला. नीरा स्नानानंतर वैभवी लवाजम्यासह आलेल्या या सोहळ्याचे सातारा जिल्हावासियांनी मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले. सायंकाळी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लोणंद नगरीत हा सोहळा विसावला. उद्या (बुधवार) सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होणार आहे.

श्री हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे होते. श्रीमंत महादजी शिंदे यांच्या दरबारात ते सरदार होते. श्री ज्ञानेश्वर माउलींचे निस्सीम भक्त असलेल्या हैबतबाबानी सन  १८३२ मध्ये माउलींचा पालखी सोहळा सुरु केला. आज त्यांचे वंशज बाळासाहेब आरफळकर पवार हे सोहळ्याचे मालक असुन त्यांच्या अधिपत्याखाली सोहळा चालतो . त्याकाळी या सोहळ्याला श्रीमंत शितोळे सरकार, आळंदीकर, वासकर, खंडोजीबाबा आदिनी सहकार्य केले. ती परंपरा आजही चालू आहे. पालखी सोहळा प्रस्थान ठेवीत असताना श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी माउलींच्या पादुका हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर यांच्या स्वाधिन करते. आळंदी ते पंढरपूर व परत आळंदीला माघारी येईपर्यंत त्या त्यांच्या ताब्यात असतात . नीरा स्नानाचा मानही त्यांना आहे .

आज (मंगळवार) सकाळी  साडेसहा वाजता  पालखी सोहळ्याने वाल्हेकरांचा निरोप घेतला. सकाळी १०.२० वाजता तो नीरा येथे पोहचला. येथे असंख्य भाविकांनी सोहळ्याचे स्वागत केले व माउलींचे दर्शन घेतले. येथे दुपारी एक पर्यंत सोहळा विसावला.

दुपारी एक वाजता माउलींसह वैष्णवांनी पुणे जिल्ह्याचा निरोप घेतला. पुणे जिल्हाप्रशासनाच्या वतीने सोहळ्याला निरोप देण्यात आला.

शाही नीरा स्नान 

आपल्या वैभवी लवाजम्यासह फुलानी सजविलेल्या चांदीच्या रथात विराजमान झालेल्या ज्ञानराजानी नीरा नदी पार करुन सातारा जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला. नीरा स्नानासाठी माउलींच्या पादुका हैबतबाबांचे वंशज राजाभाउ पवार आरफळकर यांच्या स्वाधिन केल्या. त्यांच्या समवेत पालखी सोहळा प्रमुख योगेस देसाई हे होते . माउली, माउली नामाचा जयघोष करीत त्या नीरा नदी तीरावरील दत्त घाटावर आणण्यात आल्या . दत्त घाटावर हजारो भाविकानी गर्दी केली होती . नीरा स्नानाच्या मार्गावर सुंदर रांगोळी घातली होती. पालखी सोहळ्यात नीरा व चंद्रभागा स्नानाला अनन्य साधारण महत्व आहे . माउलींच्या पादुका नीरा व चंद्रभागा नदीवर स्नानासाठी नेल्या जातात. नीरा नदीवरील माउलींच्या या शाही स्नानाचा सोहळा हजारो भाविकानी आपल्या डोळ्यात साठविला. 

सातारा जिल्ह्यात उत्साही स्वागत 

नीरा स्नान उरकुन दुपारी दीड वाजता अश्वानी व पावणे दोन वाजता माउलीनी शूर विरांच्या व गुरु हैबतबाबांच्या सातारा जिल्ह्यात प्रवेश केला . यावेळी सातारा जिल्ह्याच्यावतीने खा रणजितसिंह नाईक निंबाळकर ,  साताराचे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंगल, पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते,  जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह असंख्य जिल्हावासियांनी ज्ञानराजांसह पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले. पाडेगाव येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे झांज पथकाचे स्वागत स्विकारून हा सोहळा लोणंदकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी समाज आरतीनंतर सोहळा येथे विसावला.

आज पहिले उभे रिंगण 

पालखी सोहळ्यात तरडगाव जवळील चांदोबाचा लिंब, वाखरी जवळील बाजीराव विहीर व पंढरपूर जवळील इसबावी येथे उभे तर पुरंदावडे, खुडुस फाटा, ठाकुरबुवा व वाखरी जवळ गोल रिंगण घेण्यात येते. उद्या दि.३ रोजी पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे दुपारी होईल.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: