वेटर ,महामंडळाचे अध्यक्ष ते राष्ट्रवादीचे आमदार, हनुमंतराव डोळस यांचा प्रवास थक्क करणारा…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे आतड्यांच्या कॅन्सरमुळे मुंबईतील सैफी रुग्णालयात निधन झाले.  ते ५६ वर्षांचे होते. माळशिसर येथून राष्ट्रवादीकडून ते दोन वेळा विधानसभेवर निवडून आले होते. विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. 


    
हनुमंतराव डोळस यांचा जन्म माळशिरस तालुक्यातील दसूर या गावी १ जून १९६२ रोजी झाला. ते चार महिन्यांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले आणि आठ वर्षांचे असताना वडीलांचे छत्र हरपले. त्यानंतर जीवनातील अनेक चढउतार पचवत त्यांची आमदारकीपर्यंतची काहणी खूपच हेलावणारी आणि प्रेरणादायक आहे. 

आपल्या जन्मगावी पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अनाथ झालेल्या हनुमंतराव यांनी नातेवाईकांच्या मदतीने बोंडले येथे पाचवी ते सातवी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी महाराष्ट्राचे माहेरघर असलेली पंढरी गाठली. अकरावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबई गाठली. शिक्षणपूर्ण करण्यासाठी त्यांनी काही काळ हॉटेलमध्ये वेटरचे काम केले. अशातच त्यांनी बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. 


१९८० मध्ये माळशिरस आमदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी हनुंमतरावांची ओळख झाली. त्यानंतर त्यांची मेहनत आणि परिश्रम पाहून विजयसिंह मोहिते पाटील यांनी हनुमंतरावांना बोरिवली शाखेचे युवक काँग्रेस अध्यक्ष केले.  त्याचा कामाचा उरक पाहता त्यांना मुंबई शहर युवक काँग्रेस कार्यकारणीवर निवडण्यात आले. मोहिते पाटील यांनी १९९० मध्ये म्हाडाच्या सदस्यपदी हनुंमतरावांची निवड केली. १९९९ मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली, मोहित पाटलांसोबत हनुमंतरावांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना डोळस हे प्रदेश सरचिटणीस होते. त्यांनी आमदार होण्यापूर्वी चर्मकार विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून ही काम केले आहे.शरद पवार आणि मोहिते पाटील यांच्या विश्वासातील व्यक्ती म्हणून त्यांना २००९ आणि २०१४ मध्ये माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळाले. माळशिसर हा मतदारसंघ राखीव असल्याने हनुमंतराव दोन वेळा विधानसभेवर निवडून आले. पण गेल्या दोन वर्षांपासून त्यांची तब्येत खूप खालावली. आतड्यांचा कर्करोगाने त्यांना खूप बेजार केले. आज अखेर मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

admin: