विदर्भातील सात जागांमध्ये आघाडी व महायुती ला किती जागा मिळतील, कमेंट करा

टीम ग्लोबल न्युज:

पुणे:   लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात महाराष्टातील विदर्भा विभागातील आज मतदान झालेल्या 7 मतदारसंघांत महायुती व आघाडी मध्ये कोणाला किती जागा मिळतील हे खाली कमेंट करून सांगा .

राज्यातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, वर्धा तसेच यवतमाळ या सात मतदारसंघांचा यात समावेश आहे.

सात मतदारसंघांतील लढतींवर एक नजर…

1) नागपूर
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गत निवडणुकीत भाजप नेते नितीन गडकरी यांनी विजय मिळवला होता. यंदा मात्र भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले नाना पटोले यांनी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. त्यामुळं या निवडणुकीकडं राज्यासह देशाचंही लक्ष आहे. या मतदारसंघात जेवढा नितीन गडकरींचा प्रभाव आहे, तेवढाच नाना पटोलेंचाही जनसंपर्क दांडगा आहे, यामुळे अत्यंत चुरशीची लढत म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

2) वर्धा
वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रामदास तडस, काँग्रेसच्या चारुलता टोकस आणि वंचित बहुजन आघाडीचे धनराज वंजारी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात टोकस या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत प्रभा राव यांच्या कन्या आहेत, तर भाजपने विद्यमान खासदाराला पुन्हा संधी दिली आहे. मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे असणार आहे.

3) गडचिरोली-चिमूर
नक्षलग्रस्त भाग अशी ओळख असलेल्या गडचिरोली-चिमूर या मतदारसंघात भाजपचे अशोक नेते, काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेश गजभिये यांच्यात लढत होणार आहे. 2014 निवडणुकीत भाजपच्या अशोक नेते यांनी बाजी मारली होती. राहुल गांधींच्या न्याय योजनेचा प्रभावामुळे यावेळी येथील निकाल बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

4) रामटेक 
विदर्भातील रामटेक हा महत्त्वाचा मतदारसंघ असल्याचे मानले जाते. या ठिकाणी माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांची शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांच्याशी थेट लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे किरण रोडगे हेदेखील मैदानात आहेत.

5) भंडारा-गोंदिया 
भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे एन. के. नान्हे मैदानात आहेत. २०१८च्या पोटनिवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला होता. परंतु राष्ट्रवादीने विद्यमान खासदाराला डावलून पंचबुद्धेंना तिकीट दिले. नेहमी वेगळा निकाल देणारा मतदारसंघ म्हणून भंडारा-गोंदियाकडे पाहिले जाते.

6) चंद्रपूर
चंद्रपूर मतदारसंघातही चुरशीची लढत पाहावयास मिळणार आहे. भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, काँग्रसेचे उमेदवार सुरेश धानोरकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोळे यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे.

7) यवतमाळ-वाशीम
यवतमाळ-वाशीम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात लढत होत आहे. बच्चू कडू यांच्या प्रहारने वैशाली येडे या शेतकरी आत्महत्याग्रस्त महिलेला उमेदवारी दिली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

admin: