विठ्ठल मंदिर विद्युत रोषणाईने निघाले उजळून, वाचा सविस्तर-

पंढरपूर : आषाढी वारीनिमित्त जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालखी सह राज्य व परराज्यातील मानाच्या पालखी सोहळ्याने पंढरीकडे प्रस्थान केले आहे. आषाढी यात्रेचे वारकऱ्यांसह साऱ्या राज्याला लागले आहे. यानिमित्ताने पुणे जिल्ह्यातील विनोद जाधव या भक्ताने विठूरायाच्या राऊळाला आकर्षक विद्युत रोषणाईने उजळवून टाकले आहे.

मुळचे पुण्यातील मुळशी तालुक्याचे असलेल्या विनोद जाधव यांची विठ्ठल मंदिराला रोषणाई करण्याची खूप वर्षांपासूनची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. सलग पाच दिवसांच्या अथक मेहनतीनंतर त्यांचे स्वप्न साकार झाले असून आजपासून मंदिरावरील ही रोषणाई सुरु करण्यात आली आहे.

यंदा पहिल्यांदाच विठ्ठल मंदिराच्या आतील बाजूसदेखील आकर्षक पद्धतीने उंची झुंबर, पडदे लावत चक्क मंदिराला राजवाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे. विठ्ठल मंदिराचे महाद्वार, रुक्मिणी द्वार, पश्चिम द्वार या प्रमुख प्रवेशांच्या ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्याशिवाय संपूर्ण मंदिर परिसर, तुकाराम भवन, दर्शन मंडपदेखील या रोषणाईने उजळून गेला आहे.

मंदिराच्या आतील बाजूसदेखील आकर्षक रोषणाई करण्यास सुरुवात केली आहे. विठ्ठल सभामंडप या आकर्षक रोषणाईने झगमगू लागला आहे. नामदेव पायरीजवळ अतिशय आकर्षक पद्धतीने LED दिव्यांच्या माळा वापरुन रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराची शिखरे आणि मंदिरावर विविध रंगांच्या दिव्यांचे फोकस मारण्यात आल्याने विठ्ठल मंदिराचे रुपडेच पालटले आहे.

दरवर्षी मंदिर समिती आषाढी यात्रेतील प्रमुख 3 दिवस थोडी रोषणाई करीत असे, परंतु गेल्या चार वर्षांपासून मंदिराला केलेली वेगळ्या पद्धतीची रोषणाई भाविकांना पाहायला मिळत आहे. यामुळे यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी विठ्ठल मंदिरातील ही विद्युत रोषणाई प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: