लवकरच होणार महायुतीवर शिक्कामोर्तब – उद्धव ठाकरे

मुंबई | विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. कधीही आचार संहिता लागू होऊ शकते. दरम्यान या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेतील युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबत सोमवारी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही सकारात्मक गोष्टी समोर आल्या. भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे वृत्त आहे. तर लवकरच महायुतीवर शिक्कामोर्तब होणार असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

शिवसेना-भाजपमधील जागावाटपावर सध्या चर्चा सुरू आहे. ही चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. महायुतीमध्ये शिवसेना, भाजपसह रिपब्लिकन पक्ष (रामदास आठवले), राष्ट्रीय समाज पक्ष, राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार विनायक मेटे यांच्या संघटनेचाही समावेश आहे. या पक्षांकडून विधानसभेसाठी आपल्याला हव्या असलेल्या जागांची संख्या कळवण्यात आली आहे. मात्र, सेना-भाजपमध्ये जागावाटपाच्या समीकरणाचा तिढा कायम आहे. हा तिढा सुटल्यानंतर छोट्या पक्षांना किती आणि कोणत्या जागा सोडायच्या हे  निश्चित केले जाणार आहे.

मित्र पक्षांनी कितीही जागा मागितल्या, तरी त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार जागा दिल्या जातील असे पक्षांच्या बैठकीनंतर समोर आले आहे. ज्या जागा सोडणे शक्य आहे, त्यांची कल्पना मित्र पक्षांना देण्यात येणार आहे. जानकर, खोत यांच्या पक्षांना पश्चिम महाराष्ट्रातील तर, आठवले यांच्या पक्षाला मुंबईसह अन्य ठिकाणच्या काही जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे.

तर लवकरच महायुतीवर शिक्कामोर्तब होईल असे उद्धव ठाकरे पत्रकारांची बोलताना म्हणाले. मातोश्रीवर पत्रकरांशी बोलताना ते म्हणाले की, युतीच्या चर्चेमध्ये केवळ जागावाटपाविषयी चर्चा होत नाही. इतरही अनेक महत्त्वाच्या बाबी आहेत. त्यावरही चर्चा केली जाते. महायुती झाल्यानंतरही इतर जागांवरील चर्चा सुरू राहणार आहे. महायुतीवर कधीही शिक्कामोर्तब होऊ शकते असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: