राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यामागे ईडीचे चौकशीचे शुक्लकाष्ठ, मोदींनी प्रचारातच दिले होते संकेत

मुंबई । अंमलबजावणी संचालनालय राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांना कथित एव्हिएशन घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स बजावले आहे. पटेलांना 6 जून रोजी ईडीसमोर हजर होण्याचे आदेश असून त्यांची चौकशी केली जाणार आहे.

मोदींनी प्रचारातच दिला होता इशारा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोंदियामधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले होते. मोदी म्हणाले होते की, “तिहार जेलमधील एका कैद्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडवली आहे.” मोदींच्या या वक्तव्यावरून मोठा गदारोळ उडाला होता. तिहार तुरुंगात असलेला तो कैदी कोण, आणि त्याचा कुणाशी संबंध? यावरून राज्यभरात विविध चर्चांना उधाण आले होते. आता प्रफुल्ल पटेलांना घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. विशेष म्हणजे, मंत्रिपद भूषवलेल्या प्रफुल्ल पटेलांनी यावेळी निवडणुकीत रस दाखवला नव्हता. त्यांनी निवडणुकीला उभे राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

राष्ट्रवादीचे नेत्यांमध्ये चौकशीचा ससेमिरा

दुसरीकडे, राष्ट्रवादी नेते, माजी मंत्री छगन भुजबळांची यांची बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीमार्फतच चौकशी सुरू आहे, तर सिंचन घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांची एसीबीमार्फत चौकशी सुरूय. आता प्रफुल्ल पटेलांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. तथापि, ईडीचा सरकारकडून गैरवापर होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने सातत्याने केला आहे. एव्हीएशन घोटाळ्याची चौकशी ईडीने 2017 मध्ये सुरू केली होती.

70 हजार कोटी रुपये किमतीच्या 111 विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण याचा तपासही ईडी करत आहे. प्रफुल्ल पटेल मंत्रिपदावर असताना कथित घोटाळा झाल्याने त्यांची ईडी चौकशी करणार आहे. तथापि, मी ईडीला पूर्ण सहकार्य करणार, असल्याची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

admin: