खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन !
वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ
नवी दिल्ली : केंद्रीय सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल-जून या तिमाहीतील जीडीपी घसरुन 5 टक्क्यांवर आले आहे. गेल्या साडे सहा वर्षातील हा सर्वात कमी जीडीपी आहे. निवडणूक आचार संहितेमुळे सरकारचा भांडवली खर्च कमी होणे, विविध क्षेत्रातील घट, विक्री कमी होणे यासह विविध कारणांमुळे जीडीपीत घसरण झाली आहे.
नवी दिल्ली : देशातील १० मोठ्या बँकाचे विलीनीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे. त्यांनी आज राजधानी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची घोषणा केली. या निर्णयामुळे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकाची संख्या २७ वरून १२ वर पोहोचली आहे.
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०१९-२० च्या पहिल्या तिमाहित आर्थिक विकास दरात (जीडीपी) घट होऊन तो ५ टक्के झाला आहे. मात्र, जागतिक अर्थव्यवस्थेच्या खराब कामगिरीच्या तुलनेत आणि भारतीय अर्थव्यस्थेत आलेल्या सुस्तीच्या पार्श्वभूमीवर हा दर समाधानकारक असल्याचे मत देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई: नोटाबंदीनंतर आलेल्या 100 रुपयांच्या चलनी नोटेला आता नवी झळाळी मिळणार आहे. दोनशे, पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटेबरोबर जांभळ्या रंगाच्या नव्या 100 रुपयांच्या नोटेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आता या नोटेला वॉर्निश लावण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात प्रसिद्ध केला आहे.
मुंबई : शताब्दी, तेजस, इंटरसिटी आणि डबलडेकर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना लवकरच तिकिटांवर २५ टक्के सवलत मिळण्याची शक्यता आहे. या गाड्यांमधील आसने मोठ्या प्रमाणावर रिकामी राहत असल्याच्या पार्श्वभूमीवर होणारे नुकसान कमी करण्यासाठी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमधीस आसनांवरही सवलत देण्यात येणार आहे.
मुंबई : शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय नारायण राणें यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं भाजपात विलिनीकरण करणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे नारायण राणेंचं भवितव्य अद्यापही अधांतरित असल्याचं दिसत आहे.
गुजरात : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अमित शाह यांच्यावर स्तुतीसुमने उधळले आहे. भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच देशाचे लोहपुरुष आहेत सच्चे कर्मयोगी आहेत असे म्हणत स्तुती केली आहे. गुजरातच्या गांधीनगर येथील पंडित दिनदयाल पेट्रोलियम युनिव्हर्सिटीच्या एका कार्यक्रमात ही उपमा मुकेश अंबानी यांनी अमित शाह यांना दिली.
मुंबई : खासदार नारायण राणेंच्या भाजपत जाण्याच्या निर्णयानंतर आता छगन भुजबळांच्या पक्षप्रवेशावरुन शिवसेनेत खलबत सुरु झाली आहे. “राणे तुमचे तर, भुजबळ आमचे” अशी चर्चा आता शिवसेनेत सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांचं संख्याबळ वाढवण्यासाठी भुजबळांना शिवसेनेत घेण्याची शक्यता आता वर्तवली जातं आहे.
मुंबई : मराठवाड्याच्या सुमारे 2 कोटी लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्वाकांक्षी योजनेचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. या योजनेंतर्गत 1 हजार 330 किलोमीटरची मुख्य पाइपलाईन टाकण्यात येईल. 11 धरणे जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी आणि इतर धरणे लूप पध्दतीने जोडण्यात येतील असे ते म्हणाले.
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येणाऱ्या गणेशोत्सवात ६ दिवस रात्री १२ पर्यंत देखावे व स्पीकर सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना रात्री १२ पर्यंत देखाव्यांचा आनंद घेता येणार आहे.
मोहोळ : सहा वर्षीय चिमुकलीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावल आहे. दीपक ऊर्फ पिंटू मेहरबान पवार वय ४०, रा. येलमवाडी, ता. मोहोळ असे या शिक्षा झालेल्या दोषीचे नाव आहे. सोलापूर येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यु.एल. जोशी यांनी ही शिक्षा सुनावली.
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपला उघडपणे मदत करणारे माण येथील काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरीभावू बागडे यांची भेट घेवून गोरे यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला.
सोलापूर : झेडपीचे प्राथमिक शिक्षण अधिकारी संजयकुमार राठोड व जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर दैवज्ञ यांनी जिल्हा नियोजन सभेत ठराव होऊनही अंमलबजावणीत कुचराई केल्याने जिल्हाधिकार्यानी दोघांचे चौकशी करून अहवाल सादर करावा असा आदेश पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे.
सोलापूर : सोलापूर रेल्वे मंडल अध्यक्षपदी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड झाली आहे. पुणे येथील रेल्वे विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड झाली. यानिमित्ताने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजीं यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे सत्कार केला. यामंडलात पुणे, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, सांगली, अहमदनगर या 7 जिल्ह्यांची समावेश आहे.
सोलापूर : केगावं येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या 13 बेकायदेशीर इमारत पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के.धर्माधिकारी आणि जी.एस. पटेल यांनी दिली आहे. तसेच संस्थेला 1 लाख रुपयांचे दंड ठोटावले आहेत अशी माहिती महापालिकेचे उच्चन्यायालयातील वकील दीनदयाल धनुरे यांनी दिली.