राज्य महिला आयोगाला नवे सदस्य ,चंद्रिका चौहान, अनुसया गुप्ता, ज्योती भोये, रोहिणी नायडु, रिदा रशीद आणि गयाताई कराड यांची नियुक्ती

मुंबई, : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. त्यामधे चंद्रिका चौहान (सोलापूर), अनुसया गुप्ता (नागपूर), ज्योती भोये (जव्हार, जि. पालघर), रोहिणी नायडू (नाशिक), रिदा रशीद (मुंबई) आणि गयाताई कराड (परळी, जि. बीड) यांचा समावेश आहे. यापैकी गयाताई कराड यांची फेरनियुक्ती आहे.

आयोगाच्या अध्यक्षपदी श्रीमती विजया रहाटकर यांची यापूर्वीच फेरनियुक्ती झालेली आहे. नव्या सदस्यांच्या नियुक्तीची अधिसूचना १३ सप्टेंबर २०१९ रोजी राजपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ नुसार आयोगामधे सात सदस्य असतात. त्यानुसार सातही सदस्यांची नियुक्ती आता झालेली आहे. याशिवाय राज्याचे पोलिस महासंचालक हे आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. त्यानुसार पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल हे ही आयोगाचे सदस्य आहेत.

सोलापूरच्या चंद्रिका चौहान या ‘उद्योगवर्धिनी’ संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी दीर्घकाळ कार्यरत आहेत. नागपूरच्या अनुसया गुप्ता या महिला दक्षता समिती, ‘लोकपंचायत’च्या माध्यमातून सक्रिय आहेत. जव्हारच्या ज्योती भोये या पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. अादिवासी महिलांसाठीचे त्यांचे काम आहे. नाशिकच्या रोहिणी नायडू या अनेक सामाजिक संस्थाशी निगडीत आहेत. विशेषत: आरोग्य क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. मुंबईच्या रिदा रशीद यांनी अल्पसंख्यांक समूहातील महिलांसाठी उत्तम काम केले आहे. शिक्षण व कौशल्य यावर त्यांचा भर असतो. गयाताई कराड या ही मराठवाडयातील महिलांसाठी कार्यरत आहेत. या नव्या सदस्यांचे अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्वागत केले आहे. आयोगाच्या कामाला व वेगाला आणखी गती मिळेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

विंदा कीर्तीकर, देवयानी ठाकरे, नीता ठाकरे, ॲड आशा लांडगे या मावळत्या सदस्यांच्या योगदानाबद्दलही रहाटकर यांनी आभार मानले.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: