मुंबई: देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण हे आता १०००च्या वर गेले आहे. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आता कोरोनाबाधितांची संख्या २१५ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार असे दिसून आले आहे की, पुण्यातील ५, मुंबईतील ३, नागपुरातील २, कोल्हापूर १, नाशिकमधील १ असे एकूण नवे १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. काल (रविवार) राज्यात एकूण २२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. एकूण १० नवे रुग्ण काल मुंबईत आढळले आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात सतत रुग्ण वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्याभरापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान देखील अनेक नागरिक बाहेर पडत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणखी काही कठोर नियम करण्याची शक्यता आहे.
भारतात आतापर्यंत ११३९ रुग्ण आढळले!
दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण ११३९ रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत २७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ९० रुग्ण हे बरे झाले आहेत.
जगाचा विचार केला तर आतापर्यंत कोरोनाचे एकूण रुग्णांची संख्या ७ लाखांहून अधिक झाली आहे. तर संपूर्ण जगात कोरोनामुळे ३४,००० हून अधिक लोक मरण पावले आहेत. इटलीमध्ये एका दिवसात एक हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.
महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?
मुंबई – 103
पुणे – 25
पिंपरी चिंचवड – 17
सांगली – 25
नागपूर – 15
कल्याण – 7
ठाणे – 5
नवी मुंबई – 6
यवतमाळ – 4
अहमदनगर – 3
सातारा – 2
कोल्हापूर – 3
गोंदिया – 1
पनवेल – 2
उल्हासनगर – 1
वसई विरार – 4
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
जळगाव – 1
बुलढाणा – 1
नाशिक – 1
एकूण – 215