राज्यातील नागरपालिकांना मिळणार 550 कोटींचे अनुदान,सोलापुरातील सहा पालिकांसाठी 43 कोटी

बार्शी 15,पंढरपूर 12 तर सांगोला नगरपरिषदेस सुमारे 6 कोटी 48 लाख रूपयांच्या कार्यात्मक अनुदान निधीस मान्यता

राजेंद्र यादव

सांगोला/प्रतिनिधी ः
14 व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्यासाठी सन 2017-18 या आर्थिक वर्षाचा कार्यात्मक अनुदान रू. 550.91 कोटींचा निधी वितरीत करण्यास महाराष्ट्र शासनाकडून काल मंजूरी देण्यात आली आहे.

हा निधी लवकरच पात्र नगरपरिषदांना वितरीत होणार असल्याचे शासन निर्णयाद्वारे सांगण्यात आले आहे. यानुसार सांगोला नगरपरिषदेस सुमारे 6 कोटी 48 लाख रू. निधी मिळणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली.

14 व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार सांगोला नगरपरिषदेस सन 2017-18 या आर्थिक वर्षाचा कार्यात्मक अनुदान निधी सुमारे 6 कोटी 48 लाख 84 हजार 186 रूपये वितरीत होणार आहे. हा निधी लोकसंख्या व क्षेत्रफळ या निकषांवर ठरविला गेला आहे.

या निकषांनुसार राज्यातील 94 पात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना हा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील इतरही नगरपरिषदांचा समावेश आहे.

यात बार्शी नगरपरिषद सुमारे 15 कोटी 40 लाख रू., पंढरपूर नगरपरिषद सुमारे 12 कोटी 38 लाख रू., मंगळवेढा नगरपरिषद सुमारे 2 कोटी 64 लाख रू., कुर्डूवाडी नगरपरिषद सुमारे 2 कोटी 90 लाख रू., माळशिरस नगरपरिषद सुमारे 3 कोटी 87 लाख रू., यांचासुध्दा समावेश आहे.

हा निधी पात्र नगरपरिषदांना आर.टी.जी.एस/एन.ई.एफ.टी/ई.सी.एस. द्वारे तात्काळ वितरीत करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक यांना स्वतंत्रपणे सूचना करण्यात आल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांना सुमारे 43 कोटी रुपये अनुदान मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांनी सांगितले.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: