मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ उलटला. तरीही सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करता न आल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीचा निर्णय घेतला. आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. यानंतर अमित शाहांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे कधी ठरले नव्हते असे ते म्हणाले. आता यावर संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. राजकारणात शिवसेनेने आजपर्यंत कधीच व्यापार केला नाही. आम्ही कोणाच्याही कोणत्याच गोष्टी ओरबडून घेतल्या नाही. महाराष्ट्राचा इतिहास याची साक्ष देतो. बंद दाराआड झालेल्या गोष्टी का बाहेर आल्या याचा विचार अमित शाह यांनीच करावा, असंही ते म्हणाले.
आम्हाला घाबरुवून धमकावण्याचा प्रयत्न करु नये. तसेच बंद दरवाज्याच्यामध्ये जी बोलणी झाली, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का सांगण्यात आली नाही असा सवालही राऊत यांनी यावेळी केला. निवडणुकीदरम्यान आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतं मागितली. त्यामुळे निवडणुकीदरम्यान ठरवलेल्या गोष्टी त्यांना कळणं अपेक्षित होतं. आम्ही त्यांचा आदर करतो. बंद खोलीमध्ये ज्या गोष्टी ठरतात, त्यावर अंमल झाला नाही. त्यामुळे त्या बाहेर आल्याचंही राऊत म्हणाले.
यासोबतच बुधवारी अमित शाहांनी शिवसेनेला सवाल केला होता. अडीच अडीच वर्षे हा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्लूया ठरला होता. तर जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून करत होतो तेव्हा शिवसेनेनं आक्षेप का घेतला नाही असे ते म्हणाले. यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, आम्ही पंतप्रधानांचा आदर करतो आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्हाला ते करायचं नव्हतं. भाजपाला जरी त्यांचा आदर नसला तरी आम्ही त्यांचा आदर करतो. म्हणून आम्ही त्यावेळी त्यावर कोणताही आक्षेप घेतला नाही. बंद दाराआडच्या चर्चा योग्य वेळी मोदींपर्यंत पोहोचल्या नाहीत. युती कोणत्या कारणामुळे झाली हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोटं पाडण्याची इच्छा नाही. असे राऊतांनी स्पष्ट केले.
पुढे राऊत म्हणाले की, बाळासाहेबांची खोली म्हणजे आमच्यासाठी मंदिर आहे. या खोलीमध्ये आम्ही चर्चा केली. मंदिरात झालेली चर्चा कोणी नाकारत असेल तर तो बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्या खोलीत चर्चा झाली, ती सामान्य खोली नव्हती. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची खोली होती. आमच्यासाठी ते मंदिर आहे. त्या मंदिरात ही चर्चा झाली होती. असेही संजय राऊत म्हणाले.