राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे बाळासाहेबांना अभिवादन केले. रोहित यांनी फेसबुक पोस्टमधून बाळासाहेबांनी मोठ्या मनाने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं सांगितलं, तसेच प्रणब मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील यांनाही खुल्या मनाने राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला होता, याची आठवण करुन दिली. महाराष्ट्राचं हित लक्षात घेऊनच बाळासाहेबांनी कार्य केल्याचं रोहित यांनी म्हटलं. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, शिवसेनेची भूमिका बाळासाहेबांच्या विचारांना अनुसरून असल्याचंच दर्शविण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.
रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
मी कॉलेजसाठी मुंबईला होतो. मुंबई आणि बाळासाहेब ठाकरे हे समीकरण अगदी लहानपणापासून मनात कोरलेलं होतं. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाच्या स्टाईलचं मला नेहमीचं कौतुक वाटतं आलं आहे. माझ्या मुंबईतल्या काळात स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या या राजकारणाची स्टाईल जवळून पाहता आणि अनुभवता आली.
महाराष्ट्राच्या या भूमीला रत्नांची खाण म्हणलं जातं. स्व.यशवंतराव चव्हाण साहेब, स्व.बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्याप्रमाणेच अनेक रत्ने या महाराष्ट्राच्या भूमीने देशाच्या राजकारणाला दिली. मला या सर्वच लोकांच विशेष यासाठी वाटतं कि हे सर्वजण आपल्या निर्णयावर नेहमीच ठाम असत. प्रत्येक निर्णय घेताना लोकांच भलं करणं हाच एकमेव विचार त्यांच्या मनात असे. म्हणूनच राजकारणाचा फायदातोटा न पहाता बाळासाहेबांनी प्रसंगी कॉंग्रेसला देखील पाठिंबा देवू केला. प्रतिभाताई पाटील, तसेच प्रणब मुखर्जी यांसारखे व्यक्ती राष्ट्रपती व्हावेत म्हणून अगदी खुल्या मनाने पाठिंबा दिला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचा वेळोवेळी सन्मान केला आहे. मा.अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेत सत्ता असताना काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त कलादालन उभा करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला होता. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने असणाऱ्या या कला दालनाचे उद्घाटन आदरणीय पवार साहेबांनी केले होते. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीनिमित्त उभा करण्यात आलेली ही कदाचित महाराष्ट्रातील पहिली वास्तू असेल.
थेट भूमिका घेणारी अशी माणसं महाराष्ट्राला लाभली हे आपलं भाग्य आहे असे मी समजतो. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.