मुख्यमंत्र्यांची मुलाखत सपशेल अपयशी ठरली आहे, आशिष शेलारांचे टीकास्त्र

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला विशेष मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी सरकार स्थापनेच्या घडामोडीपासून वादग्रस्त नागरिकता कायद्यापर्यंत, राहुल गांधींपासून अजित पवारांपर्यंत प्रत्येक प्रश्नावर उत्तरे दिली. यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीविषयीही खुलासे केले. तसेच भाजपवरही निशाणा साधला आहे. आता भाजपच्या आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत सपशेल अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.

आशिष शेलार म्हणाले की, या मुलाखतीमध्ये राज्याचा रोड मॅप असेल असं वाटलं होतं. मात्र ही महाविकास आघाडी कशी झाली याचा खुलासा करणारी ही मुलाखत होती. ही मुलाखत सपशेल अपयशी ठरली आहे. राजकीय हेतूने घेतलेला हा महाविकास आघाडीचा निर्णय होता. दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांना त्याचा खुलासा करावा लागत आहे. असेही यावेळी आशिष शेलार म्हटले.

पुढेल बोलताना आशिष शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत त्यांनी राज्य पुढे कसं नेईन, शेतक-यांना कसा दिलासा देतील, युवकांचे-रोजगाराचे प्रश्न कसे सोडवतील? याचा रोडमॅप असावा अशी अपेक्षा होती. मात्र यामध्ये त्यांनी अनैसर्गिक आघाडीचा खुलासा केला. आम्हाला कोणाला हिंदुत्व शिकवायचं नाहीये पण जनतेच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही विचारणार. जे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे ते दिसतंय का असा प्रश्न आहे. राजकीय हेतुने घेतलेले निर्णय कसे पचवता येत नाहीये हे यातून दिसतंय. असा टोलाही शेलारांनी यावेळी लगावला.

आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याचे बोलले जात होते. याविषयी त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी व्यक्तीगत कोणाचाही उल्लेख केला नाही. पण तरीही कोणाला याबद्दल वाईट वाटलं असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो. असंही शेलारांनी स्पष्ट केलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: