बार्शी :नगरपरिषदेच्यावतीने शहरातील पोस्ट चौक भवानी पेठ ते जुनी राजन मिल सोलापूर रोड या ६ कोटी ९३ लाख रुपये किंमतीच्या नवीन सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन भाजपा नेते, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राऊत म्हणाले, नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात व विस्तारित भागात मूलभूत सोयीसुविधांबरोबरच विकासकामे प्रगतीपथावर आहेत. शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारीमुळे डासांचा प्रतिबंध होवून रोगराईला आळा बसण्यास मदत होईल. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. शहरातील विविध भागात नविन रस्ते व खराब रस्त्यांचे नुतनीकरण कामे मंजुरी झालेले असून लवकरच नवीन रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. सध्या बार्शी शहरांमध्ये भगवंत मैदानाचे अदययावतीकरण, नवीन व्यापारी संकुले, बगीच्यांचे विकास, घरकुले, शहरातील रस्त्यांवर एलईडी बल्ब, विस्तारित भागातील नविन रस्ते, गटारी, शहरातील रस्ते व गटारी दुरुस्ती, सार्वजनिक शौचालय आदींच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. बार्शी शहराच्या पाणी पुरवठयाचे भविष्यातील पुढील ५० वर्षांचा विचार करून, त्याच्या नियोजनासाठी उजनी ते बार्शी या नवीन सुमारे २०० कोटी रुपयांच्या पाईपलाईनच्या कामाची बार्शी नगरपरिषदेत मंजुरी घेऊन हा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयांसमोर दाखल केलेला असून मुख्यमंत्र्यांनी तो लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
बार्शी शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी कटिबद्ध असून लवकरच बार्शी शहराला एक ते दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून कोट्यवधी रुपयांचा निधी बार्शी शहर व तालुक्याच्या विकासासाठी मिळाला. यावेळी राऊत यांनी विकासकामांबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचे सांगत माजी आ. सोपल यांच्यावर टीका केली.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष अॅड.आसिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, अॅड अनिल पाटील, जि.प माजी विरोधी पक्षनेते संजय पाटील, ज्येष्ठ नेते कौरव माने, कुंडलिक गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब सय्यद, अरुण नागणे, पांडुरंग गव्हाणे, सुभाष लोढा, अण्णासाहेब घबाडे, केशव घोगरे, भारत पवार, अण्णासाहेब लोंढे, बाळासाहेब पवार, बाबासाहेब कापसे, बाबासाहेब मोरे, सुधीर बारबोले, एल.बी.शेख,भैया बागड, बापूसाहेब नाकाडे, दामोदर काळदाते, थोरे काका, बाळासाहेब मुळे, पक्षनेते विजय राऊत, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले व सर्व नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.