मुख्यमंत्री पंढरपुरात घेणार काळे, परिचारक व भालकेंचा पाहुणचार,वाचा कोणाकडे कसे असेल स्वागत

पंढरपूर – आषाढी वारीसाठी पंढरीकडे निघालेले प्रमुख संतांचे पालखी सोहळे बुधवारी नवमी दिवशी सायंकाळी वाखरी या अंतिम मुक्कामी पोहोचले असून येथे त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. दरम्यान गुरूवारी संतभेटीच्या कार्यक्रमानंतर पालख्या पंढरीत दाखल होणार आहेत.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी भंडीशेगावचा मुक्काम आटोपून बुधवारी वाखरीत आली असून वाटेत या सोहळ्याचे बाजीराव विहिरीजवळ उभे 3 वाजून15 मिनिटांनी तर गोल रिंगण सव्वा पाच वाजता झाले.

यासाठी पंढरीतून हजारो भाविक बाजीराव विहीर येथे गेले होते. तर जगत्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पिराची कुरोलीचा मुक्काम आटापून आज वाखरीत प्रवेश केला. येथे अन्य संतांच्या पालख्या ही थांबल्या आहेत. संत मुक्ताई व  संत गजानन महाराज पालखी सोहळे बुधवारी पंढरपूर शहरात दाखल झाले असून संत मुक्ताईंच्या पादुकांना चंद्रभागा स्नान घालण्यात आले. याच बरोबर अनेक लहान मोठ्या दिंड्या पंढरीत आल्या आहेत.

श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन आता गोपाळपूरच्या पुढे गेली असून किमान दीड ते दोन लाख भाविक रांगेत उभे आहेत. बुधवारी दुपारी झालेल्या पावसाने वारकर्‍यांची थोडी तारांबळ उडाली मात्र नंतर पर्जन्यराजाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते.

मुख्यमंत्री घेणार काळे, परिचारक व भालकेंचा पाहुणचार

फडणवीस हे उद्या 11 रोजी पंढरीत येत असून त्यांच्यासमवेम मंत्रिमंडळातील अनेक सहकारी असणार आहेत. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे महापूजेसाठी येतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

फडणवीस हे पंढरीत गुरूवारी सायंकाळी येत असून ते सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष व नुकतेच भाजपात आलेल्या कल्याणराव काळे यांच्या निवासस्थानी आयोजित सत्कार समारंभास हजेरी लावणार आहे. यापूर्वी ही आघाडी सरकारच्या काळात काळे यांच्या घरी मुख्यमंत्री येत असत. यंदा भाजपाचे मुख्यमंत्री काळे यांच्या निवासस्थानी येत आहेत. यानंतर फडणवीस हे आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे जाणार असून तेथे ते भोजन घेतील तर एकादशी दिवशी सकाळी काँगे्रस आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी ते जाणार असल्याचे सांगण्यात आले. तेथे ते उपवास असल्याने ते फराळ करणार आहेत. त्यांच्या समवेत काँगे्रसमधून नुकतेच भाजपात आलेले गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे असणार आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: