मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट; वाचा सविस्तर-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार म्हणून सभागृहात केव्हा येणार याबाबतचा पेच अजूनही कायम असून आज सकाळी ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घेतली. राजभवनावर सुमारे वीस मिनिटे झालेल्या या भेटीत काय ठरले हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठीची निवडणूक तातडीने घ्यावी, अशी विनंती त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्यपालांनी एका पत्राद्वारे तशी मागणी आयोगाकडे केली आहे. त्यानुसार आज निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. आज महाराष्ट्र राज्य स्थापनेला साठ वर्षे पूर्ण झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेतली.

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार नियुक्तीवरून घटनात्मक पेच उभा राहण्याचा धोका आहे. तो टाळण्यासाठी ही निवडणूक होणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी काल निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. ठाकरे हे विधीमंडळाच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

याचा अर्थ राज्यपाल कोट्यातून ठाकरे यांची नियुक्ती होणार नाही, असेही राज्यपालांनी वेगळ्या अर्थाने स्पष्ट केले आहे की काय, अशी चर्चा या पत्राचा आधार घेऊन होत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या जागांसाठीच्या निवडणुका रद्द केल्या. महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालीच नाही. ही निवडणूक मार्चच्या अखेरच्या टप्प्यात जाहीर होणे अपेक्षित होते. ती न झाल्याने ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करावे, अशी शिफारस राज्य मंत्रीमंडळाला राज्यपालांकडे करावी लागली. त्यावर निर्णय़ न घेता राज्यपालांनी आयोगालच निवडणूक घेण्याची विनंती केली. राज्यपालांची विनंती आयोग मानणार की त्याची अंमलबजावणी करणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

राज्यपाल कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदारकी मिळणार की नाही याबद्दलची शंका कायम असल्याने महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंंग्रेस आणि कॉंंग्रेस यांनीही निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला. तसेच उच्च न्यायालयातही निवडणुकीसाठी मागणी केली आहे. याशिवाय राज्यपालांना महाविकास आघाडीचे नेते वारंवार भेटत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: