मुंबई कधी कोरोना मुक्त होणार ? आशिष शेलार यांनी शिवसेनेला विचारले अनेक प्रश्न

मुंबई कधी कोरोना मुक्त होणार भाजपाचा शिवसेनेला सवाल

सुरज गायकवाड

ग्लोबल न्युज: सध्या राज्यात मुंबई शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आज हाच धागा पकडत भाजपाने शिवसेनेला अडचणीत आणायचा प्रयत्न सुरु केला आहे.

यावर भाजप नेता आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज मुंबई महापालिका, राज्य सरकार आणि शिवसेनेला लक्ष्य करत ‘मुंबईला करोनामुक्त कधी करणार?’, असा सवाल उपस्थिय केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पॅकेजवर शिवसेनेकडून जी प्रतिक्रिया आली त्याला प्रत्युत्तर देताना शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

देशात करोनामुळे जी अभूतपूर्व अशी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजचे विवरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले असून सर्व घटकांना आर्थिक आधार देण्याचा त्यात प्रयत्न करण्यात आला आहे.

या पॅकेजचे स्वागत करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईचे महत्त्व अधोरेखित केले व मुंबईसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. त्यावर शेलार यांनी निशाणा साधला. शेलार यांनी नामोल्लेख टाळून जोरदार टीका केली होती.

देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल! तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की, मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या? हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला!’, अशा शब्दांत शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून टोलेबाजी केली.

शेलार यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये मुंबईत सध्या करोनामुळे जी स्थिती उद्भवली आहे त्यावर बोट ठेवत शिवसेना आणि पालिकेला जाब विचारला. ‘मुंबईला करोनामुक्त कधी करणार? हे सांगा, मुंबईला पूर्वपदावर कधी आणणार? हे सांगा, मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? हे सांगा, मुंबई पुरामुळे तुंबणार नाही, याची हमी द्या! केंद्र सरकार शक्य ते करून दाखवत आहेतच…आता तुम्ही काहीतरी करुन दाखवा ना!’, असा टोला शेलार यांनी लगावला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: