मी आरेला कारे म्हणणारा, अजित पवारांचा राम शिंदेंना इशारा

अहमदनगर । अहमदनगर येथील कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी खर्डा येथे अजित पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेसाठी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदार संघाचे भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यावर सणसणीत टीका केली. आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला किंवा दहशत केली तर जशास तसे उत्तर देऊ. आम्ही काय बांगड्या घातल्या नाही अशा शब्दात अजित पवार यांनी इशारा दिला. इतकेच नाही तर मी आरे ला कारे म्हणणार माणूस आहे, त्यामुळे जर कोणी दम दिला तर रात्री बारा वाजता कार्यकर्त्यांसाठी धावून येऊ असं म्हटलं आहे.

दरम्यान, ‘काही जण मला सांगतात कर्जत जामखेडच्या परिसरात काही गटामध्ये काही दबाव आहे, काही दहशत आहे. आम्ही काय असं-तसं इथे आलोय काय? जे अशा प्रकारची दादागिरी, गुंडगिरी करतील, ज्या गावच्या बोरी असतात, त्याच गावच्या बाभळी असतात. हे त्यांनी विसरु नये. आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत’, अशा शब्दात अजित पवार यांनी इशारा दिला. कर्जत जामखेड मतदारसंघात अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार विरुद्ध भाजप मंत्री राम शिंदे असा रंगतदार सामना आहे.

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टीकेचे लक्ष्य केले. निवडणुकीत समोर कोणताच विरोधक नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. मग असं असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहा, गृहमंत्री अमित शाह यांना वीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शंभर सभा का घ्याव्या लागतात? असा सवाल अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केला. आज सर्वसामान्य माणूस पेटून उठला आहे. पण तरुणाईचा उत्साह अभूतपूर्व आहे, असंही अजित पवार म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: