या निवडणुकीत विरोधकांच्या पेकाटात अशी लाथ घाला की…!उद्धव ठाकरेंची स्थानिक विरोधकांवर टीका

बार्शी: बार्शी ही भगवंताची असून आजच्या गर्दीतून भगवंतच माझ्यासोबत प्रकट झाला आहे. चांगल्या कामाला भगवंताचे आशीर्वाद असतात. दिलीप सोपल यांच्यावर आमचा खूप दिवसांपासून डोळा होता. मात्र ते चुकवत होते. ते जुने सहकारी व हक्काचा माणूस आहे. मध्यंतरी त्यांनी काळ त्यांनी वेगळी वाट धरली होती. काही मांजरासारखे आडवे येत होते. आता ती मांजरं राहिली नाहीत.

गद्दाराविषयी बोलायची गरज नाही. या निवडणुकीत त्यांच्या पेकाटात अशी लाथ घाला की पुन्हा कधी निवडणुकीला उभा राहाता कामा नये, अशी राजेंद्र राऊत यांचे नाव न घेता टीका करत दिलीपराव हे स्वतःसाठी नाही तर लोकांचे विषय तळमळीने माझ्याकडे मांडतात. सत्ता येताच वैराग तालुक्याची निर्मिती केली जाईल, असे आश्‍वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.

ते बार्शी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजपा युतीचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या प्रचारार्थ जुना गांधी पुतळा येथे आयोजित सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी शशिकांत पवार हे होते. यावेळी उमेदवार दिलीप सोपल, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, महाहौसिंगचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर, स्थानिक शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, प्रकाश शेंडगे, मकरंद निंबाळकर, नंदकुमार काशीद, युवराज काटे, आर्यन सोपल, योगेश सोपल आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, दिलीप सोपल यांनी सांगितलेल्या सर्व मागण्या पूर्ण करु. ते स्वतःसाठी काही मागत नाही. तुमचेच विषय ते तळमळीने मांडतात.  ते आमचे चांगले सहकारी आहेत. विरोधकांसारखी जिथे जावू तिथे खाऊ अशी माणसे काही कामाची नाहीत. आम्ही चूक सुधारलेली आहे. तुम्ही सुधारा. हे भूत बाटलीत बंद करुन बुच मारा. मतदारांशी गद्दारी करणारे निवडून येता कामा नये, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी स्थानिक उमेदवारांवर केली. तुम्ही चांगली माणसे निवडून द्या. युती सरकारने अनेक चांगली कामे केली आहेत. शिवसेना युतीत आहे, होतो व राहणार. सत्तेत असताना जे पडले नाही त्याच्या विरोधात बोललो. सरकार चुकलं असेल तर त्यांचे कान उपडण्याचे काम मी केले. चांगल्या कामाला कधी विरोध केला नाही, पाय घातला नाही. भाजपाचे सरकार हे अस्थिर होते. हिंदुत्व, जनता व राज्याच्या हितासाठी हे सरकार मी स्थिर नाही तर मजबुत केले. आमच्यात कधीच भांडणे नव्हती. लोकसभेला आम्हाला भरभरुन दिले. राज्याने आमच्या युतीला स्वीकारले याचा अभिमान वाटतो. जनता आशीर्वाद देत असताना आम्ही करंटे पणाने का वागू हे सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत.

यावेळी राजेंद्र मिरगणे, माजी मंत्री प्रकाश शेंडगे, भाऊसाहेब आंधळकर, देवा कुलकर्णी, देवा दिंडोरे, वाहिद शेख, आब्बास शेख, किरण गायकवाड, बिभीषण पाटील, संगमेश्‍वर भडुळे, मकरंद निंबाळकर, राजा काकडे, अमोल काकडे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन नागेश अक्कलकोटे व अ‍ॅड. विकास जाधव यांनी केले. या सभेसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: