माढ्यातुन बबनराव शिंदे यांच्या विरोधात संजय कोकाटे शिवसेनेचे उमेदवार

माढा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून संजय कोकाटे यांची उमेदवारी फिक्स करण्यात आली आहे. संजय कोकाटे हे भाजपचे माढा तालुकाध्यक्ष आहेत. महायुतीच्या घटकपक्षांच्या झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कोकाटे हे आ. बबनराव शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. कोकाटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच शिवाजी राजे कांबळे हे बैठकीतून नाराज होऊन बाहेर पडले. 

संजय कोकाटे हे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे शासननियुक्त संचालक आहेत. ते सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. युतीमधून शिवसेनेला हा मतदारसंघ सुटल्यानंतर याठिकाणी सेनेच्या उमेदवारी संदर्भात रस्सीखेच सुरु होती. सेनेकडून कल्याणराव काळे किंवा शिवाजी कांबळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. या दोघांच्या नावावर सर्व विरोधकांचे एकमत होत नव्हते.

उमेदवारीसंदर्भात सातत्याने बैठका होत होत्या. गुरुवारी परांडा तालुक्यातील सोनारी येथे महायुतीतील नेत्यांची बैठक ना. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यात संजय कोकाटे यांचे नाव निश्चित करून त्यासंदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्पना देण्यात आली असून लवकरच कोकाटे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येईल असे खात्रीलायक वृत्त आहे.

शिवसेना कुणाला उमेदवारी देणार याची मोठी उत्सुकता या मतदार संघातील जनतेला लागून राहिली होती. हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्यास असून भाजपात प्रवेश केलेले कल्याणराव काळे यांच्यासाठी हा मतदार संघ शिवसेना भाजपासाठी सोडेल आणि मोहिते पाटील यांच्या पाठबळावर कल्याणराव काळे भाजपाचे उमेदवार म्हणून मैदानात उतरतील अशी आशा कल्याणाराव काळे समर्थकांना वाटत होती मात्र हा मतदार संघ सोडण्यास शिवसेनेने नकार दिल्याने काळे यांची गोची झाल्याची चर्चा होत होती.

संजय कोकाटे यांनी गेल्या पाच वर्षात आ. बबनराव शिंदे यांच्या एकछत्री कारभाराविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. आ. बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील कृषी उत्पन्न बाजार समिती, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराविरोधात त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली होती.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: