माझ्या राजकीय निर्णयापेक्षा दुष्काळ निवारण महत्त्वाचे- आदित्य ठाकरे

उस्मानाबाद: आज सकाळी उद्धव ठाकरे दुष्काळपाहणीसाठी जालन्यात दाखल झाले, तर युवासेना नेते आदित्य ठाकरे सोलापूरमध्ये पोहोचले. दुष्काळग्रस्तांना पाणी आणि जनावरांसाठी चारा पुरवण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. जोपर्यंत दुष्काळ संपत नाही तोपर्यंत शिवसेना दुष्काळग्रस्तांना मदत करणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या लवकरच दूर करु असा विश्वास आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला. उस्मानाबाद मधील भूम परांडा अशा चार छावण्यांना आदित्य भेट देणार आहेत. छावणीतील महिला व पुरुषांना काम मिळवून देण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

सोलापूरमध्ये चारा छावणीतील शेतकऱ्यांना महाप्रसादाचे धान्य वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमास आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. उद्धव ठाकरेंच्या हस्ते भोजन योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. पत्रकारांशी संवाद साधताना येणाऱ्या विधानसभेच्या प्रश्नांवर उत्तर देणं आदित्य यांनी टाळलं.

माझ्या राजकीय निर्णयापेक्षा दुष्काळाचे निवारण करणे गरजेचे असल्याचं वक्तव्य आदित्य यांनी केले. मात्र विधानसभेला उमेदवारी मुंबईतून की ग्रामीण भागातून या प्रश्नाला उत्तर देताना शहरी आणि ग्रामीण प्रश्न वेगळे असल्याचं म्हणत विधानसभा लढवण्याची इच्छा त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली असंच म्हणावं लागेल.

admin: