महाहौसिंगचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा
बार्शी तालुक्याच्या सेवायात्रीला भा.ज.पा. शासनाची लाल दिव्याची गाडी
बार्शी : महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (महाहौसिंगचे) सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांना आज भा.ज.पा. शासनाने कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा घोषित केला आहे. राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानूसार शासनाचे अवर सचिव दुर्गाप्रसाद मैलावरम यांनी शासकीय आदेशा द्वारे हा निर्णय जाहीर केला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या वसाहतींचे प्रकल्प उभारण्याच्या उद्दिष्ठाने राज्यात घरकुलांच्या निर्मितीसाठी पुर्णवेळ कार्यरत अशा महामंडळाची स्थापना दि.11/12/2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये झाली होती. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील 384 शहरांमध्ये 5 लाख घरांची निर्मिती 2022 सालापर्यंत करणे हे या महामंडळाचे उद्दिष्ट आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्याने निश्चीत केलेले 26 लाख घरकुले निर्मितीचे उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी गृहप्रकल्पाच्या निर्मितीला प्रभावीपणे गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
राजेंद्र मिरगणे हे गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ञ, अनुभवी, अभ्यासू अभियंता व गृहप्रकल्प विकासक आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांना परवडेल अशा किंमतीमधील दर्जेदार व अत्याधुनिक घरांच्या निर्मितीबाबत त्यांचा मोठा अभ्यास आहे.
त्यांचे या क्षेत्रातील योगदान लक्षात घेवुन शासनाने त्यांची नियुक्ती केल्यानंतर सात महिन्यात मिरगणे यांनी या पदावर उमटवलेला कार्यक्षमता व कार्यपध्दतीचा संस्मरणीय ठसा लक्षात घेवुन मिरगणे यांना हा कॅबीनेट मंत्री पदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.
महाहौसिंगचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील बेघरांसाठी गृहप्रकल्प उभारणीबाबत महत्वकांक्षी निर्णय घेतले. पुणे येथे 10 हजार व भुसावळ येथे 5 हजार घरांच्या वसाहतीला तत्कालीन स्थानीक गरज लक्षात घेवुन तातडीने मंजूरी दिली. आता ऑगस्ट 2019 मध्ये 11200 घरांच्या प्रकल्पांना मंजूरी मिळणार आहे. पोलीस कर्मचारी, होमगार्ड, माजी सैनिक, बांधकाम कामगार, विविध खात्यातील शासकीय कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र व समर्पित गृहप्रकल्प उभारणाचा महत्वपुर्ण निर्णय महाहौसिंगने नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानूसार घेतला आहे.
राज्यातील 10 शहरामध्ये अशा समर्पित स्वरूपाचे गृहप्रकल्प कार्यान्वीत होणार आहेत. सोलापूर मध्ये असे तीन प्रकल्प नुकतेच मंजूर झाले आहेत व राज्यभरात असे गृहप्रकल्प उभारले जाणार आहेत.
ग्रामीण भागातील वंचित, गरजू बेघरांना घरे देण्यासाठी ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातही स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनोदय आहे.
अशा ग्रामसमुह गृहप्रकल्पांची अंमलबजावणी राज्यातील 100 गावांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून केली जाणार आहे. नंतर राज्यभरातही असे गृहप्रकल्प उभारले जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून बेघरांची संख्या लक्षात घेवुन 26 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी इतर शासकीय गृहनिर्माण मंडळांना पुरक संस्था म्हणून महाहौसिगचे काम महत्वाचे ठरणार आहे.
महाहौसिगच्या माध्यमातून गृहनिर्माण उद्दिष्ठ पुर्तीसाठी पाटबंधारे, कृषी व अन्य खात्यांच्या जुन्या शासकीय वसाहती, खुल्या शासकीय जागा यांची उपयोजन केले जाणार आहे. शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत उद्दिष्ट पुर्तीसाठी खाजगी बांधकाम व्यावसायिक व गृहप्रकल्प विकासक यांचा सहभाग वाढावा या उद्देषाने महाहौसिगचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी कन्सल्टन्सी सर्व्हीस (मार्गदर्शन सेवा) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवे योजनेअंतर्गत या घटकांना सर्व तांत्रिक सहाय्य, विक्री व्यवस्थापन याबाबत सर्वतोपरी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री व सरकारचा विश्वास सार्थ ठरवू
घर हे सामाज्ञ माणसाचे जिवनातले सर्वोच्च महत्वाचे उद्दिष्ट असते. पक्ष, राज्यशासन व मुख्यमंत्री महोदयांचा विश्वास सार्थ ठरवत उद्दिष्टपूर्ती करू असा विश्वास मिरगणे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
मुंबई येथे मंत्रीपद दर्जा निश्चितीनंतर मिरगणे यांचे मुख्यमंत्री, गृहनिर्माणमंत्री, सहकारमंत्री, माजी मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, कोकणचे म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, पर्यावरणमंत्री जयकुमार रावळ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा व्यक्त केल्या.