मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. त्यातच आता ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे नेते नांदेड चे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे.
त्यांना लवकरच मुंबईत उपचारांसाठी आणलं जाणार आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. पण लोकमत , इंडिया टुडे आदी मीडिया समूहाने याबाबत वृत्त दिले आहे.
ठाकरे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. चव्हाण यांच्याआधी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची बाधा झाली होती.
सुरुवातीला आव्हाड यांनी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातल्या रुग्णालयात उपचार झाले. आव्हाड यांच्या संपर्कात आलेल्या काही सुरक्षा कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वीच आव्हाड कोरोनावर मात करून घरी परतले.