मराठा आरक्षण: पंढरपुरात सकल मराठा समाज करणार मुखमंत्र्यांचा सत्कार

मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण केल्याने पंढरपूर मधील सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करुन त्यांचा सत्कार करणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांनी दिली. गेल्या वर्षी याच आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना श्री विठ्ठलाच्या महापूजेपासून रोखले होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मोर्चे आणि आंदोलने सुरु असताना पंढरपूर मधील आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनाच आषाढी एकादशीच्या महापूजेपासून रोखणार असल्याचा इशारा दिला होता. सकल मराठा समाजाच्या या इशाऱ्याला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. कोणत्याही परीस्थितीत मुख्यमंत्र्यांना रोखणारच या इशाऱ्यावर आंदोलक ठाम होते. तर दुसरीकडे प्रशासन मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते महापूजा करण्याच्या मानसिकतेत होते. हा वाद विकोपाला गेल्याने मुख्यमंत्र्यांनी महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला होता व ते महापूजेला आले नव्हते.

वारीची गर्दी आणि या गर्दीत काही अनुचित घडले तर त्याचा त्रास वारकऱ्यांना होईल हा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्री विठ्ठल रखुमाईची पूजा केली. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्याने, सकल मराठा समाजाचा मुख्यमंत्र्याप्रती असलेला विरोध मावळला असून उद्याच्या आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी येणाऱ्या मुखमंत्र्यांचे जंगी स्वागत करुन त्यांचा उचित सत्कार करणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.

या पत्रकार परिषदेस माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, मोहन अनपट, जयवंत माने, दीपक वाडदेकर, संतोष कवडे, किरण घाडगे, शेखर भोसले, दत्ता पाटील आदी उपस्थित होते.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: