महसूलमंत्री, कृषिमंत्री आणि त्याआधी उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या 602 दालनाचा धसका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. या दालनात कोणीही मंत्री फार काळ टिकत नसल्याने अजित पवार यांनी सहाव्या मजल्यावरील हे प्रशस्त दालन घेण्यास नकार दिला आहे. त्याऐवजी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे दालन अजित पवार यांनी पसंत केले असून आता याच दालनातच उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय थाटले जाणार आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी पार पडला. आता मंत्रालयातले कोणते दालन कोणत्या मंत्र्याला दिले जाणार याबाबत शोधाशोध सुरू झाली आहे. मंत्रालयाचा सहावा मजला हे सत्ताकेंद्र असून या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दालने आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनानंतर उपमुख्यमंत्र्यांचे दालन हे सर्वात मोठे दालन मानले जाते. मात्र अजित पवार यांनी 602 क्रमांकाचे हे दालन स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्याऐवजी त्यांनी सीताराम कुंटे यांचे दालन पसंत केले आहे.
602 दालनाचा धसका कशासाठी?
2012 साली काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना मंत्रालयाला आग लागली. या आगीत त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांचे 602 हेच कार्यालय होते. हे कार्यालय या आगीत भस्मसात झाले. याच कार्यालयात चार कर्मचाऱयांचाही मृत्यू झाला. मंत्रालयाचे नूतनीकरण झाल्यानंतर याच कार्यालयाच्या दालनात एकनाथ खडसे यांनी आपल्या महसूलमंत्रीपदाच्या कारभारास सुरुवात केली, मात्र अवघी दोनच वर्षे एकनाथ खडसे या कार्यालयात राहिले.
त्यानंतर ते जमिनीच्या वादात अडकल्याने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला व ते सक्रिय राजकारणापासून दूर गेले. त्यानंतर कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे हे दालन हेते. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्यानंतर हे दालन पुन्हा रिक्त झाले. भाजप सरकारच्या शेवटच्या टप्प्यात अनिल बोंडे यांनी कृषिमंत्री म्हणून याच दालनात पदभार स्वीकारला. मात्र अवघ्या काही महिन्यांतच लागलेल्या निवडणुकांत अनिल बोंडे यांचा पराभव झाला. त्यामुळे हे दालन शापित तर नाही ना, अशी चर्चा रंगली असून याचाच धसका अजित पवार यांनी घेतला असल्याचे म्हटले जात आहे.
अजित पवार काय म्हणतात…
दालनाबाबत स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, उपमुख्यमंत्रीपदाचे दालन असे सहाव्या मजल्यावर नव्हतेच. गेली पाच वर्षे राज्याला उपमुख्यमंत्रीच नक्हता. त्याच्यामुळे असणाऱया दालनाचे छोटे छोटे भाग करण्यात आले आहेत. या छोटय़ा छोटय़ा भागातून कुठले मोठे दालन घ्यायचे ते मी ठरवलेले आहे. त्यानुसार तशा सूचना दिलेल्या आहेत. सीताराम कुंटे जिथे बसायचे तिथे मी दालन उपमुख्यमंत्री म्हणून करतोय. जेणेकरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव असे तिघेही सहाव्या मजल्यावर येतील, असे सांगतानाच एका बाजूला मुख्यमंत्री, दुसऱया बाजूला उपमुख्यमंत्री आणि दोघांच्या मध्ये मुख्य सचिव कात्रीत सापडून काम करतील, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.