भालकेंचे वेटिंग करत राष्ट्रवादीशी सेटिंग..काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन झाले राष्ट्रवादी मध्ये दाखल

पार्थ आराध्ये

पंढरपूर –  पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष व महायुतीकडे उमेदवारीसाठी खूप मोठी रस्सीखेच होती. काँगे्रसचे आमदार भारत भालके यांनी भाजपाकडे उमेदवारीचे प्रयत्न केले खरे पण ते सतत वेटिंगवरच रहात होते. अखेर त्यांनी आज सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाची सेटिंग करत शरद पवार यांच्या पक्षाबरोबर जात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

भालके यांनी आपल्या आमदाकीचा दुपारी राजीनामा दिला. तर दुसरीकडे सुरूवातीला बॅकफूट गेलेला परिचारक गट सुधाकरपंतांच्या रिंगणात उतरण्याने पुन्हा उर्जित अवस्थेत आला असून आमदार प्रशांत परिचारक यांनी मित्रपक्षांंची गुगली विरोधकांना टाकत उमेदवारी खेचण्यात यश मिळविल्याचे चित्र आहे.

येथे परिचारक व भालके हे परंपरागत विरोधक असून यंदा कोणत्याही परिस्थितीत भालकेंना पराभूत करण्याचा चंग परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे. मात्र भाजपाकडून ही  जागा शिवसेनेला दिली जाण्याची शक्यता तसेच आमदार भालके यांनी भाजपाशी वाढविलेली सलगी पाहता येथील उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबत साशंकता होती.

भालके हे अनेक दिवस भाजपा प्रवेशाच्या वेटिंगवर असल्याचे चित्र होते यामुळे परिचारक गट ही अस्वस्थ होता. महायुतीच्या जागा वाटपात पंढरपूरची जागा ही मित्रपक्ष असणार्‍या रयत क्रांतीला सोडल्याच्या वृत्ताने परिचारक गटात आनंदाचे वातावरण पसरले व येथून सुधाकरपंतांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान भालके यांची ही तिसरी निवडणूक असून प्रत्येक वेळी त्यांनी नवीन पक्ष स्वीकारला आहे. सुरूवातीला ते रिपब्लिकन डाव्या लोकशाही आघाडीकडून लढले, गतनिवडणुकीत काँगे्रसचा हात हातात घेतला तर आता राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले आहे. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांच्या उपस्थितीत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: