भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई । भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर ते प्रथमच महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत त्यांचे विविध कार्यक्रम होणार असल्याचं भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितलं आहे.

भाजप विशेष प्रदेश कार्यसमिती बैठकीत ते मार्गदर्शन करतील. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय पदाधिकारी आणि केंद्रीय मंत्रीही बैठकीला उपस्थित असतील. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जे.पी. नड्डा यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

सुजितसिंह ठाकूर म्हणाले की, जे. पी. नड्डा यांचे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता मुंबई विमानतळावर आगमन होईल. तेथे कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत केले जाईल. आगमनानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. शनिवारी सायंकाळी भाजप कार्यालय, वसंतस्मृती, दादर येथे ते प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार तसेच अन्य बैठकांमध्ये मार्गदर्शन करतील.

दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी सकाळी दादर येथे चैत्यभूमीला अभिवादन करतील आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे भेट देऊन वंदन करतील. गुंडवली, अंधेरी येथे भाजपाच्या बूथ समितीच्या कार्यक्रमात सहभागी होतील. तेथे त्यांच्या हस्ते भाजपाची सदस्यता नोंदणी करण्यात येईल आणि वृक्षारोपण करण्यात येईल. त्यानंतर नड्डा हे गोरेगाव, मुंबई येथे भाजप विशेष प्रदेश कार्यसमिती बैठकीचे उद्घाटन व मार्गदर्शन करतील.

ग्लोबल न्युज नेटवर्क: