बुध्दीमत्ता आणि कर्तबगारीच्या जोरावरच मिळाले राजेंद्र मिरगणेंना पद-दिलीप सोपलांनी केले कौतुक ,मराठा भूषण पुरस्काराने गौरव 

गणेश भोळे

सकल मराठा समाजाच्यावतीने महाहौसिंगचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांचा नागरी सत्कार व मराठा भूषण पुरस्काराने गौरव 

बार्शी :  महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांना नुकताच कॅबिनेट दर्जा मिळाल्याबद्दल सकल मराठा समाजाच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार व मराठा भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

येथील पोफळे मंगल बार्शी अर्बन को-ऑप सोसायटीचे  चेअरमन तुकाराम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ नेते शशिकांत पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी व्यासपीठावर माजी आमदार दिलीप सोपल, माजी नगराध्यक्षा मंगल शेळवणे, गणेश जाधव, दगडू मांगडे, माजी उपनगराध्यक्ष आबा पवार, संयोजक आप्पा पवार, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष किरण गाढवे, दिलीप सुरवसे यांच्यासह नगरसेवक बापू वाणी, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, बाजार समितीचे संचालक साहेबराव देशमुख, सुरज गव्हाणे आदी उपस्थित होते. 

यावेळी माजी आमदार दिलीप सोपल म्हणाले, मिरगणे यांना मिळालेले पद व मंत्रीपदाचा दर्जा हे कोणाच्या वशिल्यावर किंवा लांगूलचालन करून मिळालेले नाही तर त्यांच्या बुध्दीमत्तेच्या, कर्तबगारीच्या जोरावर मिळाले आहे.

पद मिळाल्यानंतर प्रामाणिक, निष्ठेने काम करणाऱ्या माणसाचे चीज झाले अशी भावना बार्शीकराची होती. आलेल्या व आणल्या गेलेल्या अनेक अडथळ्यावर त्यांनी मात केली. यात ते सोन्याप्रमाणे उजळून निघाले. अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार करत असताना समाजापुढे प्रेरणा, आदर्श ठेवण्याचे काम या सत्काराच्या निमीत्ताने होत असल्याचे गौरवोद्गार काढले. छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा सर्वांच्या सहकार्यातून उभा करू असेही ते म्हणाले. 

सत्काराला उत्तर देताना महाहौसिंगचे सहअध्यक्ष मिरगणे म्हणाले, हे पद मिळाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी सत्कार झाले परंतु घरच्यांनी केलेला सत्कार खूप मोलाचा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठया विश्वासाने ही जबाबदारी सोपवून यात नंतर मोठी वाढ केली आहे. सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत घरकुल योजना गतीने पुर्ण करून शासन निकषाप्रमाणे प्रत्येक गरजूंना घर देण्याचा प्रयत्न आहे. 

मिरगणे पुढे म्हणाले, कायदयाच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देत असताना कांही काळ जाणार असल्याने त्यावेळी आपण मुख्यमंत्री महोदयांना आण्णासाहेब पाटील महामंडळास निधी देण्याबाबत विनंती केली होती. त्यावर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. सकल मराठा समाजाच्या माध्यमातून मराठा समाजास आरक्षण मिळाले आहे.

परंतु, आपला लढा केवळ आरक्षणापुरताच होता असा संदेश जावू नये. शासन, प्रशासनाला भेडसावत असलेल्या सार्वजनिक समस्यांच्या व समाजबांधवांच्या समस्या सोडवणूकीसाठी प्रयत्नशील रहावे. मराठा समाजाने नेहमीच इतर समाजघटकांना सोबत घेत थोरल्या भावाची भूमिका बजावली आहे. 

त्याच भूमिकेतून कार्यरत रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. राजकारण हे निवडणूकीपुरतेच असावे. त्यानंतर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेतेमंडळींनी एकत्र येवून विकास साधणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

यावेळी राजा काकडे यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. प्रास्ताविक सुशील पाटील यांनी केले. संतोष सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. संयोजक आप्पा पवार, रविकिरण शिंदे, योगेश लोखंडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी राजाभाऊ देशमुख, युवराज काटे, नागेश अक्कलकोटे, प्रकाश गुंड, भाजपाचे तालुकाध्यक्ष बिभीषण पाटील, शहराध्यक्ष अश्विन गाढवे, शिरीष घळके, शोभा घुटे, पद्मजा काळे, प्रतिभा मुळीक आदी उपस्थित होते.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: