बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघात 115 जणांना आमदार व्हायचंय, वाचा सविस्तर…

बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघासाठी आज 87 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. 115 उमेदवार मैदानात उतरले आहेत. गेवराईचा अपवाद वगळता 5 विधानसभा मतदारसंघात थेट दुरंगी लढत पाहाण्यास मिळत आहे. गेवराईत मात्र बदामराव पंडितांच्या उमेदवारीमुळे गेवराईची लढाई रंगतदार झाली आहे.

बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघासाठी 115 उमेदवार रिंगणामध्ये उतरले आहेत. आज 87 उमेदवारांनी माघार घेतली आहे. बीड विधानसभा मतदारसंघामध्ये 17 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. 34 उमेदवार मैदानात आहे. यात शिवसेनेचे उमेदवार तथा रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर विरूद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर, एमआयएमचे उमेदवार शेख शफीक यांच्यामध्ये लढत होत आहे.

परळीमध्ये एकूण 16 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. 12 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. भाजपाच्या पंकजा मुंडे विरूद्ध राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यात थेट आणि कडवी लढत पाहाण्यास मिळणार आहे.

केज विधानसभा मतदार संघामध्ये 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत. भाजपाच्या नमिता मुंदडा विरूद्ध राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे यांच्यात थेट लढत आहे. बसापाचे परमेश्वर उदार, वंचित आघाडीचे वैभव स्वामी हे ही उमेदवार मैदानात उतरले आहेत.

माजलगावमध्ये 25 उमेदवार मैदानात उतरले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 39 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र तरीही 25 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महायुतीचे उमेदवार रमेश आडसकर विरूद्ध राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके, वंचित आघाडीचे धम्मानंद साळवे यांच्यामध्ये लढत होत आहे. वंचित आघाडीचे जीवन राठोड, मोहन जगताप, जयसिंह सोळंके, ऋषिकेश देशमुख, किरण चव्हाण या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

गेवराई विधानसभा मतदार संघामध्ये आज 9 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता मैदानात 19 उमेदवार उतरले आहेत. गेवराईत भाजपाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार, राष्ट्रवादीचे विजयराजे पंडित, अपक्ष बदामराव पंडित, वंचित आघाडीचे विष्णू देवकते असा चौरंगी सामना पाहाण्यास मिळत आहे.

आष्टी विधानसभा मतदारसंघात एकुण 9 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आज माजी आमदार साहेबराव दरेकर, साहेबराव थोरवे, जयदत्त धस, रविंद्र ढोबळे, सतिश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. भीमराव धोंडे विरूद्ध बाळासाहेब आजबे अशी थेट लढत आष्टीमध्ये पाहाण्यास मिळत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: