बीजमाता राहीबाई पोपरे आणि पोपटराव पवार या महाराष्ट्र रत्नांचा ही होणार आज पद्मश्री ने गौरव

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या बीजमाता राहीबाई पोपरे आणि अहमदनगरच्या आदर्श  गाव हिवरेबाजाराचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक सेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकीय सेवा, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर करण्यात आले

सीड मदर म्हणून राहीबाई पोपरे यांना ओळखले जाते. हायब्रीड वाण आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्या वाढल्याने विषमुक्त शेतीसाठी कृतिशील प्रयत्न राहीबाई करतात. शैक्षणिकदृष्ट्या निरक्षर असलेल्या राहीबाई ज्ञानाने खूप समृद्ध आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांना एका कार्यक्रमात राहीबाई पोपरेंचा उल्लेख मदर ऑफ सीड असा केला होता. 

गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून संकलित करणे,  इतरांना पेरणीसाठी प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे अशा पद्धतीने त्यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे. आतापर्यंत ५४ पिकांच्या ११६ वाणांच्या गावरान बियांचे जतन राहीबाईंनी केले आहे. 

आईच्या ममतेने दुर्मिळ पारंपरिक गावरान वाणांच्या बियाणांचे जतन करुन त्याची ‘बियाणे बँक ’ बनविणाऱ्या राहीबाई तालुक्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्या तमाम शेतकऱ्यांमध्ये ‘राहीमावशी’ नावाने परिचित आहेत. राहीबाईंनी आपल्या राहत्या घरात कोंभाळणेसारख्या छोट्या खेडे गावात पारंपरिक गावरान वाणांची बियाणे बँक ‘बायफ’ या सेवाभावी संस्थेच्या मदतीने सुरू केलेली आहे. या बँकेतून त्यांनी आत्तापर्यंत हजारो गरजू होतकरू शेतकऱ्यांना गावरान देशी वाणांचा पुरवठा केलेला आहे. गावरान बियाणे संवर्धन प्रचार व प्रसार यामध्ये केलेल्या भरीव कार्यासाठी राहीबाईंना ‘लोकमत’ समूहानेदेखील सन्मानित केले होते.

माझे नाव मोठे व्हावे हा उद्देश ठेवून कधीच काम केले नाही. समाजाचे भले व्हावे हाच माझा उद्देश राहिला. यापुढेही देशातील सर्वसामान्यांपर्यंत गावरान बियाण्यांचे महत्व पोहचविण्याचे काम करीत राहीन. स्वत:ला मोठे समजत नाही. पुरस्कारातूनही समाजाला जो आनंद होतोय, तोच माझा आनंद. अशी प्रतिक्रिया राहीबाई यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली.

अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. खरीप व रब्बी पिकांसाठी तसेच ग्रामस्थांच्या पिण्यासाठीची वार्षिक गरज तसेच पाळीव जनावरांना पिण्यासाठीची गरज लक्षात घेऊन यंदाच्या पावसाळ्यात गावात पडलेल्या पाण्याचे नियोजन  पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.


पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील मान्यवरांचाही गौरव करण्यात येणार आहे. यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय संघातील माजी गोलंदाज झहीर खान, डॉ. रमण गंगाखेडकर, चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, ज्येष्ठ अभिनेत्री सरिता जोशी, आदर्श गाव योजनेचे प्रणेते पोपटराव पवार, दिग्दर्शक एकता कपूर, बीजमाता राहीबाई पोपेरे, अभिनेत्री कंगना राणौत, गायक अदनान सामी, सामाजिक कार्यकर्ते सय्यद मेहमूद शाह कादरी उर्फ सय्यदभाई, साँड्रा डिसूझा, गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: