बाहेर_ये_तुम्हाला_बघून_घेतो’, बार्शीत गाड्या फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न

बार्शी – शहरातील अलीपूर रोड येथे काही अज्ञातांनी निम्म्या रात्री गोंधळ घातला. तसेच माने कुटुंबातील सदस्यांना बाहेर ये तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देत घरासमोरील गाड्यांच्या काचाही फोडल्या आहेत. याप्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील देशमुख प्लॉट येथे राहणाऱ्या श्रीमती अनिता महेश माने (35) यांनी याबाबत पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास फिर्याद दिली आहे.त्यानुसार, संशयित वैभव बोधले, आकाश हांडे, अभिनंदन भोसले, सदावर्ते (भेळवाला) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 427, 504, 506, 34 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून संशयित आरोपींनी मध्यरात्री 2:30 ते 3:00 च्या सुमारास फिर्यादी माने यांच्या घरासमोर येऊन धमक्या देत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी घरासमोरील गाडीच्या काचाही फोडल्या, बाहेर ये तुम्हाला बघून घेतो अशी धमकीही दिली. या तोडफोडीमध्ये 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्य भयभीत झाले होते. विशेष म्हणजे यावेळी घरात महिला सदस्यच असल्याने त्यांची मोठी घबराट झाली होती. त्यामुळेच पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास याबाबत फिर्याद दिली आहे. दरम्यान, याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक भुसारे हे करत आहेत.

admin: