बाळासाहेब थोरात आणि सुजय विखेंचा शेजारी बसून एकत्रित विमान प्रवास

मुंबई | काँग्रेसचे नूतन  प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात आणि भाजपाचे नवनिर्वाचित खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी शिर्डी ते दिल्ली प्रवास योगायोगाने एकाच विमानाने  शेजारी बसून केला. त्यांच्या या प्रवासाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या प्रवासातील त्यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

सोमवारी सकाळी शिर्डी विमानतळावरून सकाळी साडेदहा वाजताच्या विमानाने ते दिल्लीकडे रवाना झाले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आमदार थोरात यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. केंद्रीय नेत्यांशी त्यांची बैठक आहे. तसेच ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. तर खा.विखे आपल्या नियोजित कामांसाठी दिल्लीकडे रवाना झाले. सोमवारी सकाळी दोघांनी एकाच विमानातून प्रवास केला. विशेष म्हणजे प्रवास सुरू होण्याआधी दोघे शेजारीशेजारी बसलेले पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भूवया उंचावल्या. काहींनी त्यांचे छायाचित्र कैद करण्याचा प्रयत्न केला.

थोरात आणि विखे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडूकीत त्यांनी एकमेकांविरोधात आरोपांची राळ उडवली होती. दोघांनी संपूर्ण प्रवास शेजारी बसूनच झाला की नाही? या प्रवासात दोघांत राजकीय चर्चा झाली की अन्य मुद्यांवर विचारांचे आदानप्रदान झाले, याची माहिती समजू शकली नसली, तर या व्हायरल फोटोमुळे मात्र राजकीय वर्तुळात दोघांच्या एकत्रित प्रवासाची चर्चा चांगलीच रंगली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: