बार्शीत 11 ते 16 मे दरम्यान भगवंत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन,  माजी आ राऊत यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे प्रकाशन 

बार्शी :  बार्शी नगरपालिका व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विदयमाने भगवंत महोत्सव समितीच्या माध्यमातून दि. ११ मे ते दि १६ मे दरम्यान येथील भगवंत मैदनावर होत असलेल्या भगवंत महोत्सवाची तयारी जोरात सुरू असून यानिमीत्ताने विविध सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या भित्तीपत्रकाचे अनावरण पालिकेत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. 

पालिकेच्या मामासाहेब जगदाळे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, भगवंत देवस्थानचे सरपंच दिलीप बुडूख, भगवंत महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष लोढा, नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी शिवाजी कांबळे, गंभीरे, दराडे, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, विलास जगदाळे, नाना सुरवसे, संतोष सुर्यवंशी, अभिजीत सोनिग्रा, वाहिद शेख, नगरसेवक दिपक राऊत, नागेश दुधाळ, अमोल चव्हाण, कय्युम पटेल, मदन गव्हाणे, शरद फुरडे, श्रीधर कांबळे, आण्णा लोंढे, तुकाराम माने यांच्यासह पालिकेचे अधिकारी, महोत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. 

यावेळी नगराध्यक्ष असिफ तांबोळी म्हणाले, मागील कांही वर्षापासून खंडित झालेली भगवंत महोत्सवाची परंपरा मागील वर्षापासून माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रेरणेतून पुन्हा सुरू झाली आहे. सांस्कृतिक तसेच अध्यात्मिक कार्यक्रमांचे यानिमीत्ताने आयोजन करण्यात आले आहे. बार्शीकरांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. 

प्रास्ताविकात श्रीधर कांबळे म्हणाले, नगरपालिकेच्यावतीने महोत्सवासाठी देण्यात आलेले १० लाख रूपये व देणगीदारांच्या सहकार्यातून हा महोत्सव होत आहे. दि.११ ते १६ दरम्यान विविध कार्यक्रम होत आहेत. शोभेच्या दारूकामासाठी शिवशक्ती बँकेने सहकार्य केले असल्याचे सांगितले. भगवंत देवस्थानचे सरपंच दिलीप बुडूख यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. 

अशी आहे कार्यक्रमाची रूपरेषा 

शनिवार दि. ११ मे रोजी शांतेच कार्ट चालू आहे, दि. १२ रोजी गौरव महाराष्ट्राचा , दि.१३ रोजी मोरूची मावशी, दि.१४ रोजी संगीत रजनी ऑर्केस्ट्रा, दि.१५ रोजी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे किर्तन, दि. १६ रोजी शोभेचे दारूकाम असे कार्यक्रम होणार आहेत. इंदुरीकर महाराजांचे किर्तन ८ वाजता तर इतर सर्व कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहेत. तसेच गुरूवार दि. १६ मे रोजी भगवंत मंदीरात पहाटे ४.३० ते ६ यावेळेत जयवंत बोधले महाराज यांचे किर्तन होणार आहे. त्याच दिवशी दुपारी १२ ते ४ यावेळेत भगवंत मंदीराजवळील मॉडेल हायस्कूलच्या प्रांगणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

admin: