बार्शीत वाढलेला नव मतदार व वंचित आघाडी यंदा ठरणार निर्णायक राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाने निवडणूक केली होती प्रतिष्ठेची

गणेश भोळे/धीरज करळे

बार्शी – मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत बार्शी विधानसभा मतदारसंघात केवळ अर्धा टक्का मतदानाची टक्केवारी वाढली असली तरी नव्याने वाढलेल्या 21 हजार  मतदारांची मते याबरोबरच तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांची झालेली एकी याचा निकालावर निश्‍चित परिणाम होणार असून वाढलेले मतदार व वंचित आघाडी कोणात्या दादाला तारक तर कोणत्या दादाला मारक ठरणार आहे हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.बार्शी तालुक्याच्या राजकारणाचा विचार करता बार्शीमध्ये गेल्या 20 वर्षांपासून आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत या दोघांभोवती राजकारण फिरत आहे. त्यात मागील काही वर्षांपासून राजेंद्र मिरगणे व भाऊसाहेब आंधळकर यांची भर पडली आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 1 हजार 156 मतदान असून यामध्ये पुरुष मतदान 1 लाख 57 हजार 73 तर महिला 1 लाख 43 हजार 878 एवढे आहे. यापैकी या निवडणुकीत 99 हजार 837 पुरुष तर 86 हजार 838 महिला असे एकूण 1 लाख 86 हजार 680 (61.99%) मतदारांनी मतदान केले आहे. सन 2014 साली 1 लाख 75 हजार 58 मतदान झाले होते. यात 96 हजार 72 पुरुष तर 78 हजार 986 महिलांनी मतदान केले होते. दोन्ही निवडणुकांची टक्केवारी जवळपास सारखीच आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आ. दिलीप सोपल, भाजपाचे माजी आ. राजेंद्र राऊत यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. भाजपाचे राजेंद्र मिरगणे व शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांनीही महायुतीकडून प्रचारात सक्रीय सहभाग नोंदविला. बार्शी तालुक्यात जातीय समीकरणांचा विचार करता मराठा, मुस्लिम, लिंगायत, धनगर व दलित समाज मोठ्या प्रमाणात आहे. या निवडणुकीमध्ये बार्शी शहरासह ग्रामीण भागात गावोगावी दलित समाजाने एकतर्फी वंचित बहुजन आघाडीची कपबशी चालविली असल्याचे दिसून आले. आजवर इतिहासात प्रथमच आंबेडकरांचे अनुनायी एकवटल्याचे पहावयास मिळाले. याबरोबरच शहरात मोठ्या प्रमाणात असलेला मुस्लिम समाजही मतदानासाठी बाहेर पडल्याचे जाणवले. एकंदरीत ही निवडणूक राष्ट्रीयस्तरावरील असली तरीही दोन्ही बाजूनी प्रचारामध्ये स्थानिक मुद्यांचा उहापोह केला गेला. त्यामुळे वरकरणी पंतप्रधान मोदी विरुद्ध शरद पवार असा सामना होत असला तरी बार्शी तालुक्यात मात्र राऊत विरुद्ध सोपल असाच सामना झालेला आहे. — चौकट –बार्शी विधानसभा मतदारसंघाची बार्शी शहर, वैराग भाग व उत्तर बार्शी ग्रामीण अशी तीन भागात विभागणी झालेली आहे. झालेल्या मतदानात बार्शी शहरातील 88 मतदार केंद्रात 52 हजार 586, वैराग शहरातील 15 केंद्रात 8 हजार 768 तर त्या खालोखाल पानगांवातील 7 केंद्रात 3 हजार 453 मतदान झाले आहे. बार्शी शहरात लिंगायत, मुस्लिम व दलित समाज मोठ्या प्रमाणात असून या समाजाने मताचे दान कोणाच्या पारड्यात टाकले यावर तालुक्यातून राणादादा की ओमदादा यांना मताधिक्य मिळणार हे 23 मे रोजीच कळणार आहे.

admin: